आता शेतकऱ्यांची रब्बीसाठी धडपड

विवेक पोतदार
Friday, 9 October 2020

खरिपातील मूग-उडिद, सोयाबिन पिकाची पावसामुळे नासाडी झाली. शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे मोठे हैराण व्हावे लागले. हाती आलेला थोडा फार माल खराब निघाल्याने अल्प दरात विकण्याची वेळ आली आहे.

जळकोट (लातूर) : तालुक्यात आता शेतकरी खरीपातील पिके काढणीनंतर रिकामे होत असलेल्या रानाची रब्बीसाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे अनेक ठिकाणी करत असून काही ठिकाणी भुईमूग पेरणीही केली असल्याचे चित्र आहे.

खरिपातील मूग-उडिद, सोयाबिन पिकाची पावसामुळे नासाडी झाली. शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे मोठे हैराण व्हावे लागले. हाती आलेला थोडा फार माल खराब निघाल्याने अल्प दरात विकण्याची वेळ आली आहे.

मूग-उडीद काढणीनंतर तसेच सोयाबीन काढणी सुरु असून रिकामी झालेली राने रब्बीसाठी मशागत करुन तयार केली जात असल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी भुईमूग पेरणी केली आहे. यासाठी रानात बैल औत मारणे कठीण जात असल्याने अनेक शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करण्याकडे कल देत आहे. यात ट्रॅक्टरची पंजी तर जास्त तण गवत असलेल्या रानात तिरी, रोटर मारले जात असल्याचे चित्र आहे.

तसेच तण जास्त असलेल्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या रोटरयंत्राच्या सहाय्याने मशागत सुरु आहे. यानंतर ही राने काही दिवस उन्हाने तापली की, रब्बीची पेरणी केली जाते. या तालुक्यात सरसकट रब्बी क्षेत्र नाही ज्यांच्याकडे सिंचनासाठी विहिर, बोअर अथवा तलावाशेजारी शेती अशी सोय असेल तेवढेच शेतकरी अल्प प्रमाणात रब्बी घेतात. ज्यात गहू, हरभरा, भुईमूग, करडई आदि पिके घेण्याचा प्रयत्न करतात. 

गोविंद बनाळे म्हणाले, रब्बीसाठी रामाची मशागत करताना खरीपापेक्षा जास्त कष्ट लागतात. कुरडु, भोंडमणी, गाजरगवत, मिरा, काटेकरळ, आदि तणामुळे मशागतीसाठी अनेकजण रोटर यंत्राला प्राधान्य देत आहेत. कारण यामुळे या गवताचे बारीक तुकडे करुन रान साफ होऊन पेरणीयोग्य होते. तण काढणीचीही मजुरी वाचते.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Jalkot taluka farmers are now working for Rabbi