Jalna : दोन आरोग्य उपकेंद्र कागदावरच Jalna Administration Health Centers health centers paper | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य उपकेंद्र

Jalna : दोन आरोग्य उपकेंद्र कागदावरच

जालना : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र व २२३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर आहेत. मात्र, यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात चक्क प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहे. तर दोन प्राथमिक उपकेंद्र ही मंजूर असून ते अद्यापि सुरू झालेले नसल्याने कागदावरच आहेत. शिवाय काही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींना ही डागडुजीची गरज आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे जिल्ह्यात ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहेत. तर २२३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आरोग्य सेवा दिली जाते. मात्र, कागदावरील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांपैकी दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दोन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र प्रत्यक्षात सुरूच नसल्याचे चित्र आहे.

भोकरदन तालुक्यातील नळणी आणि घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहे. मात्र, या ठिकाणी प्रत्यक्षात हे प्राथमिक आरोग्य केंद्रांना इमारत नसल्याने उपकेंद्राच्या इमारतीमध्ये आरोग्य केंद्राचा कारभार पाहिला जात आहे.

तर भोकरदन तालुक्यातील भोरखेडा व मंठा तालुक्यातील केदारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले आहेत. मात्र, या दोन्ही ठिकाणी हे अद्यापि हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरूच झालेले नाही. त्यामुळे मंजूर झालेले दोन प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रात सुरू असल्याने अनेकांचा गोंधळ उडत असल्याचे चित्र आहे. तर प्राथमिक उपकेंद्र हे कागदावरच असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना इमारत उपलब्ध नसल्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सुरू केले आहे. तर दोन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना इमारत नसल्याने ते सुरू झालेले नाहीत.

— डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना