Jalna : भोकरदनला हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 लंकाबाई सुखलाल राऊत

Jalna : भोकरदनला हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू

भोकरदन (जिल्हा जालना) : हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात 87 वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथे शनिवारी (ता.21) पहाटे उघडकीस आली. लंकाबाई सुखलाल राऊत असे या हल्ल्यात मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

मिळलेल्या माहितीनुसार लंकाबाई सुखलाल राऊत ही वृद्ध महिलेला दोन मुले असून, त्या एका मुलासह तालुक्यातील बाभूळगाव लगत असलेल्या चोऱ्हाळा शिवारात त्यांच्या स्वतःच्या शेतात राहत होत्या. शुक्रवारी त्यांचा मुलगा काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने वृद्ध महिला घरी एकटीच होती. मुलगा पहाटे घरी आल्यानंतर त्याला आई घरात दिसली नाही त्यामुळे आजूबाजूला शोधाशोध केली असता काही अंतरावर लंकाबाई या मृत अवस्थेत आढळून आल्या. परीसरातील ग्रामस्थांनी धावाधाव करून पोलीसांना माहिती दिली.

माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देवून पहाणी केली असता वृद्ध महिला घरापासून काही अंतरावर अर्धनग्न असवस्थेत दिसून आली शिवाय डोळे व संपूर्ण चेहरा खराब करून गळा फाडल्याचे दिसून आले. त्यामुळे हा हिंस्र प्राण्याचा हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.

लांडगा असण्याची शक्यता...

मृत महिलेचा चेहरा पुर्णपणे खराब केला असून, गळ्यावर खोलवर जखमा केल्या आहेत. त्यामुळे हल्ला करणारा प्राणी हा लांडगा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वनविभागाला घटनेची माहिती दिली असून,अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येणार आहे.