Jalna : बदनापूरच्या झेडपी शाळेला अवकळा

इमारतीची दुरवस्था, परिसरात कमालीची अस्वच्छता
ZP
ZPsakal

बदनापूर : येथील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या शाळेतील जवळपास वीस वर्गखोल्या मोडकळीस गेल्या आहेत. त्यामुळे एकीकडे ‘बेटी पढाओ’ असा नारा शासनाकडून दिला जात असला तरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा सोडाच मात्र व्यवस्थित वर्गखोल्या मिळत नसल्याचे भीषण वास्तव बदनापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे बघितल्यावर लक्षात येते.

अर्थात मोडकळीस आलेल्या जागेवर मुलींसाठी पाच वर्गखोल्या मंजूर झाल्याचे शिक्षण विभाग म्हणत असले तरी उर्वरित वर्गखोल्यांचे ‘जिर्णोद्धार’ कधी होईल हा प्रश्न अद्याप अधांतरी आहे.

वर्गखोल्यांच्या भिंती पडल्या, पत्रेही उडाली

बदनापूर तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी शिक्षणाचा दर्जा आणि शैक्षणिक सुविधा चांगल्या दर्जाच्या मिळायला हव्यात, अशी अपेक्षा पालकांची आहे. मात्र सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बदनापूरच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलींच्या वर्गखोल्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.

प्राथमिक शाळेतील जवळपास २० वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. या खोल्यांच्या भिंती पडल्या आहेत. खिडक्या चोरीला गेल्या आहेत. तर खोल्यांवरील पत्रे उडून गेली आहेत. मागील दोन - तीन वर्षांपासून या ठिकाणी वर्ग घेणे बंद झाले आहेत. एकूणच शाळेच्या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाल्याने कधीकाळी मुला - मुलींची स्वतंत्र असलेली शाळा आता एकत्रित भरवावी लागत आहे.

विद्यार्थी संख्याही घटली

बदनापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक आणि प्रशालेत पालकांना व विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेल्या शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याने अनेक पालकांनी खासगी शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश केला आहे. ही इमारत मोडकळीस आल्यापासून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या कमालीची घटली आहे. सध्या जिल्हा परिषद शाळेच्या दीड एकर आवारात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे केवळ २०४ तर हायस्कूलचे केवळ १६५ विद्यार्थी शिक्षण घेतआहेत.

हातपंप बंद, मैदानावरही वाढली झुडपे

बदनापूरच्या जिल्हा परिषद शाळेचा एकंदरीत विचार करता शैक्षणिक सुविधांसह मूलभूत सुविधांचाही मोठा वानवा निर्माण झाला आहे. या शाळेत असलेली कूपनलिका म्हणजे हातपंप अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे तहानलेल्या विद्यार्थ्यांचे पाण्याविना हाल होतात. मैदानावर झुडपे वाढल्याने त्यांना खेळताना अडचण सहन करावी लागते. परिणामी विद्यार्थी आपल्या क्रीडा कौशल्यापासून वंचित राहत आहेत.

जिल्हा परिषदेने लक्ष देण्याची गरज

कधीकाळी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या आणि बदनापूरचे वैभव अशी ओळख असलेल्या बदनापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेतील इमारत पडीक आहे. एकूणच प्रशासनाचे याकडे फारसे लक्ष नसल्यामुळे विद्यार्थी संख्याही घटत चालली आहे.

आर्थिक दुर्बल घटकांतील पालकांना आपल्या मुलांना शिकविण्यासाठी जिल्हा परिषद शाळा हा महत्त्वाचा पर्याय आहे. मात्र या शाळेचीच अवहेलना होत असल्याने सामान्य विद्यार्थी घडणार तरी कसे असा विचार करणारा प्रश्न उभा राहत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने काहीही तरतूद करून बदनापूर जिल्हा परिषद शाळेत मोडकळीस आलेली इमारत नव्याने उभारावी. या ठिकाणी दर्जेदार शैक्षणिक सुविधा द्याव्यात, यातून सामान्य घटकांतील विद्यार्थीही घडतील, अशी अपेक्षा पालकवर्गातून होत आहे.

आमच्या काळात बदनापूरची जिल्हा परिषद शाळा ही एकमेव शिक्षणाचे केंद्र होते. या शाळेने अनेक दर्जेदार विद्यार्थी घडवले आहेत. सध्या ते विविध क्षेत्रात चांगले कार्य करीत आहेत. मात्र सध्या या शाळेतील पाठीमागील इमारत पुरती मोडकळीस आली आहे. विद्यार्थी संख्याही कमालीची कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या शाळेची दुरुस्ती करावी आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

— श्रीमंत जऱ्हाड, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, बदनापूर

बदनापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेची इमारत मोडकळीस आल्याने आम्ही तसा प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पाठवला आहे. अर्थात या ठिकाणी राजमाता जिजाऊ अभियानातंर्गत पाच वर्गखोल्यांचे बांधकाम मंजूर झाले आहे. या ठिकाणी लवकरच खोल्यांचे बांधकाम होणार आहे. बदनापूर येथे खासगी इंग्रजी व मराठी शाळा असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणांत विभागणी झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत असलेल्या विद्यार्थी संख्येप्रमाणे वर्गखोल्या मंजूर झाल्या आहेत.

— बाबासाहेब जुंबड, गट समन्वयक, गटसाधन केंद्र, बदनापूर

जिल्हा परिषद शाळा म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जनाचे केंद्र असते. मात्र अशा शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा आणि चांगली इमारत मिळत नसेल तर विद्यार्थी कसे घडतील याचा विचार संबंधित यंत्रणेने करावा.

— संजय भुजाळ, नागरिक, बदनापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com