Jalna : बोगस डॉक्टरांवरील कारवाईला ब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bogus Doctors

Jalna : बोगस डॉक्टरांवरील कारवाईला ब्रेक

जालना : जिल्ह्यात मे महिन्यात आरोग्य विभागाच्या शोध मोहिमेत तब्बल १०३ बोगस डॉक्टर असल्याचे पुढे आले होते. मात्र, या बोगस डॉक्टरांपैकी ८६ बोगस डॉक्टरांवरील कारवाई अहवाल सात महिन्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झालेला नाही. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारीही या कारवाई संदर्भात उदासीन असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांची शोध मोहीम कागदावर सुरू असल्याचे चित्र आहे. बोगस डॉक्टरांच्या कारवाईला लागलेला ब्रेक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड तरी काढणार काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शहरातील ढवळेश्‍वर येथे बोगस डॉक्टरांकडून अवैध गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या प्रकरणी तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून जिल्ह्यातील मे महिन्यात बोगस डॉक्टरांची शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात १०३ बोगस डॉक्टर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे या १०३ बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई होईल, अशी अपेक्षा होती.

मात्र, सात महिन्यानंतरही या १०३ बोगस डॉक्टरांपैकी अद्यापि ८६ बोगस डॉक्टरांवरील कारवाईचा अहवालच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झालेला नाही. तर दुसरीकडे त्या काळात जिल्ह्यात १६६ खाजगी दवाखाने विना नोंदणी सुरू असल्याचेही आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. त्या विना नोंदणी खाजगी दवाखान्यांना आरोग्य विभागाकडून नोटिसा देऊन वेळकाढूपणा करण्यात आला होता. त्याचा परिणामी म्हणून आज जिल्ह्यात तब्बल २२७ विनानोंदणी खासगी दवाखान्यांकडून सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारी दुकानदारी सुरूच आहे.

बोगस डॉक्टरांची तालुकानिहाय संख्या

ज्या बोगस डॉक्टरांवरील कारवाईचा अहवाल प्राप्त झालेला नाही, त्या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. मात्र, बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी गेल्यानंतर ते डॉक्टर दवाखाना बंद करून जातात, काही ठिकाणी नागरिकांकडून विरोध केला जातो, अशा अनेक अडचणी कारवाईदरम्यान येत आहेत. इतर कामांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनीच बोगस डॉक्टरांकडे उपचारासाठी जाऊ नये. आरोग्य विभागाची बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरूच आहे.

-डॉ. विवेक खतगावकर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना.

आरोग्य विभागाला बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासंदर्भात यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन आतापर्यंत काय कारवाई केली याचा आढावा घेतला जाईल. शिवाय बोगस डॉक्टरांची शोध मोहीम करण्यासंदर्भात सक्त सूचना दिल्या जातील.

- डॉ. विजय राठोड जिल्हाधिकारी, जालना.

आरोग्यमंत्री पदावर असताना मी जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. प्रत्येक बैठकीत मी त्याचा आढावा घेत होतो. सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कारवाई केलीच पाहिजे. जर हे अधिकारी कारवाई करत नसतील आणि बोगस डॉक्टरांची शोधही घेत नसतील तर हा मुद्दा मला हिवाळी अधिवेशनात घ्यावा लागेल.

-राजेश टोपे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार, घनसावंगी