Jalna : बैलगाडीतून नेमकी वरात होती का पाहाणी दौरा - राजु शेट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetti

Jalna : बैलगाडीतून नेमकी वरात होती का पाहाणी दौरा - राजु शेट्टी

जालना : जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अतुल सावे हे अतिवृष्टीच्या पाहाणी करता आले ते सजवलेल्या बैलगाडीतून. सजवलेल्या बैलगाडीतून नेमकी वरात होती का पाहाणी दौरा हे मला माहीत नाही? पण शेतकऱ्याला मदत करत तर नाही, किमान त्याला जखमेवर मीठ तरी चोळू नका. अन्यथा बळीराजा रूम्हण घेवून तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही. असा सज्जड इशारा राजु शेट्टींनी दिला आहे.

माजी खा.शेट्टी यांनी वडीगोद्री (ता. अंबड) येथे रविवार ता. १६ रोजी त्यांनी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची भेट घेवून नुकसानीची माहिती घेतली आणि पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी या वेळी सांगीतले की,नुकसानीचे पंचनामे झाले नाही आणि मदतही मिळाली नाही.आता परत परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत सोयाबिन,तूर, कपाशी,बाजरी, मक्का, मोसंबी, द्राक्ष व डाळिंब आदी फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

या नुकसानीत शेतकऱ्यांना शासनाने आधार देणे गरजेचे असताना पालकमंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी मिठ चोळण्यासाठी फिरत आहेत काय?असा सवाल राजू शेट्टी यांनी अतुल सावे यांना केला आहे.तक्रार करून देखील विमा कंपन्या लक्ष देत नसतील तर मग सरकार करतं तरी काय असा प्रश्न राजु शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, अहमदनगर जिल्हाध्यक्ष रवी मोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, राजेंद्र खटके, विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख गणेश गावडे,शिवाजी लहाने, बाबासाहेब दखणे, बप्पासाहेब काळे, अंकुश तारख, रामेश्वर लहाने, विष्णू नाझरकर,गणेश कव्हळे, अजय काळे, लक्ष्मण उघडे, धनराज चिमणे, शुभम सोळंके, मंगेश लहाने, प्रविण लहाने, योगेश नाझरकर आदींची उपस्थिती होती.