जालना जिल्ह्यात ५३ हजारांवर कोरोना टेस्ट, सात हजार रुग्ण उपचारानंतर बरे

उमेश वाघमारे 
Thursday, 1 October 2020

जालना येथे आरटीपीसीआर लॅब सुरू झाल्याने जिल्ह्यात कोरोना संशयितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणीचे प्रमाणही वाढविण्यात आले.

जालना : जिल्ह्यात मागील सहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ५३ हजारांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आठ हजार ४५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचारानंतर सहा हजार ५९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने कोरोना चाचण्या करण्यावर भर दिली आहे. सुरवातीला कोरोना चाचणीसाठी पुणे येथे स्वॅब पाठवावे लागत होते. त्यानंतर औरंगाबाद येथे आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू झाल्याने जालना येथील स्वॅब औरंगाबाद येथे पाठविण्यास सुरवात झाली; मात्र यामुळे कोरोना चाचणी अहवाल येण्यास वेळ लागत होता. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांना जालना येथे आरटीपीसीआर प्रयोगशाळा मंजूर करून घेत ती सुरू केली. परिणामी जिल्ह्यातील कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचे अहवाल तत्काळ मिळण्यास सुरवात झाली आहे. 

जालना येथे आरटीपीसीआर लॅब सुरू झाल्याने जिल्ह्यात कोरोना संशयितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणीचे प्रमाणही वाढविण्यात आले. आतापर्यंत आरटीपीसीआर प्रयोगशाळा व अॅंटीजेन किटद्वारे तब्बल ५३ हजार १९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी आठ हजार ४५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांपैकी उपचारानंतर तब्बल सहा हजार ५९१ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या एक हजार ६५० कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.
 
जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी शोध, तपासणी, अलगीकरण व उपचार या सूत्रांवर भर देत आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी स्वॅब तपासणी हा एकच मार्ग असल्याने कोरोना चाचणीवरील भार महत्त्वाचा आहे. 

अॅंटीजेन तपासणीवरही भर 

जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार झाल्याने जिल्हा प्रशासनाने अॅंटीजेन किटद्वारे कोरोना चाचणी तपासणी करण्यावर भर दिली आहे. या तपासणीद्वारे तत्काळ कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे कळते. या तपासणीद्वारे आतापर्यंत एक हजार ९९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

संपादन -सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Jalna district 53 thousand corona tests have been conducted in six months