Jalna : अतिवृष्टीच्या मदतीपूर्वीच बेमोसमी पावसाचा फटका Jalna district heavy rains unseasonal rains | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान

Jalna : अतिवृष्टीच्या मदतीपूर्वीच बेमोसमी पावसाचा फटका

जालना : खरीप हंगामातील अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेली आर्थिक मदत अद्यापि शासनाकडून मिळण्यापूर्वीच रब्बी हंगामातील जिल्ह्यात बेमोसमी पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याचा पिकांना फटका बसला आहे. मात्र, जिल्ह्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे. तर वीज कोसळून सहा पशुधनाचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमुद आहे.

शहरासह जिल्ह्यात सोमवारी (ता.सहा) रात्री आणि मंगळवारी (ता.सात) सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. मार्च महिन्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने दोन दिवस भर उन्हाळ्यात पावसाळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

दरम्यान मंगळवारी (ता.सात) वीज पडून भोकरदन तालुक्यात दोन गाई व एक म्हैस व जाफराबाद तालुक्यात दोन गाई व एक म्हैस असे एकूण सहा पशुधनाचा मृत्यू झाला आहे. शिवाय सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमधील शेतातील पिके जमिनीशी लोळल्याचे दिसून आले. यात गहू, ज्वारी, मका, हरभरा आदी पिकांचा समावेश आहे.

मात्र, या बेमोसमी पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याने जिल्ह्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान नसल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाकडे तालुका प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे या नुकसान झालेल्या पिकांचा शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.

शिवाय सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात तीन लाख ६९ हजार ६८० शेतकऱ्यांचे तब्बल दोन लाख ६२ हजार ८०५.५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीच्या नुकसानाची आर्थिक मदत ही अद्यापि शेतकऱ्यांना मिळाली नाही. तोपर्यंतच या बेमोसमी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा रब्बी पिकांना फटका बसला आहे.

जिल्ह्यात १.३० मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये १.३० मिलिमीटर बेमोसमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक भोकरदन तालुक्यात २.१० मिलिमीटर बेमोसमी पाऊस झाल्याची नोंद आहे. तर जालना तालुक्यात ०.७०, बदनापूर तालुक्यात ०.९०, जाफराबाद तालुक्यात १.८०, परतूर तालुक्यात ०.७०, मंठा तालुक्यात १.२०, अंबड तालुक्यात १.५०, घनसावंगी तालुक्यात १.२० मिलिमीटर बेमोसमी पावसाची नोंद झाली आहे