जालना : बोगस दवाखान्यांचीही आता झाडाझडती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna fake doctors against Health Minister take action hospital sealed

जालना : बोगस दवाखान्यांचीही आता झाडाझडती

जालना : शहरासह जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा प्रश्‍न ऐरणीवर आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाईचे सक्त आदेश दिले आहेत. बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार जिल्ह्यात केवळ ४८१ रुग्णालय, दवाखान्यांची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. विशेष म्हणजे त्यातील १५ रुग्णालय बंद झाले असून ४६६ रुग्णालय सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील विनानोंदणी सुरू असलेल्या बोगस दवाखाने तसेच रुग्णालयांचीही झाडाझडती घेतली जाणार आहे. याबाबत जिल्हाभरात आरोग्य विभागाची लवकरच मोहीम राबविणार आहे.

जालना शहरातील ढवळेश्‍वर येथे राजुरेश्‍वर क्लिनिक सुरू करून तोतया डॉक्टराकडून अवैध गर्भपात होत असल्याचा प्रकार एका तक्रारदारामुळे उघड झाला. आरोग्यमंत्र्यांच्या शहरात वर्षानुवर्ष हा गोरखधंदा सुरू असल्याचे पुणे कुटुंब कल्याण कार्यालयाकडे केलेल्या तक्रारी नमुद करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली. परिणामी जिल्ह्यात नोंदणीकृत किती खाजगी दवाखाने तसेच रुग्णालय आहेत असे प्रश्‍न उपस्थित झाला. आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आजघडीला केवळ ४८१ नोंदणीकृत दवाखाने तसेच रुग्णालय आहेत. त्यातील पंधरा रुग्णालय बंद असून सध्या ४६६ नोंदणीकृत दवाखाने-रुग्णालय सुरू आहेत. त्यामुळे नोंदणीकृत असलेले वगळता इतर ठिकाणचे बोगस खाजगी दवाखाने- रुग्णालय शोधण्याचे काम आता आरोग्य विभाग करणार आहे.

आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

विशेष म्हणजे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील जालन्यातील राजुरेश्‍वर क्लिनिक प्रकरणाची गंभीर दखल घेतले आहे. बोगस खाजगी रुग्णालयांसह डॉक्टरांना पायबंद करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून बोगस डॉक्टरांची शोध मोहीम घेत गल्लीबोळातील रुग्णालयांची तपासणी करावी लागणार आहे.

बंगाली डॉक्टरांना पायबंद कोण घालणार

शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला शासनाची परवानगी न घेता मूळव्याधीसह इतर आजारांवर जडीबुटी देऊन उपचार करतात. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला ही धोका निर्माण होतो. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या जीवघेण्या बोगसगिरीवर कोण अंकुश ठेवणार, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात ज्या खाजगी रुग्णालयांनी रीतसर नोंद केली नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करावी. शहरासह जिल्ह्यातील बोगस रुग्णालयांची शोध मोहिमेला गुरुवारपासून आरोग्य विभागाचे पथक सुरवात करणार आहे.

- डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना

Web Title: Jalna Fake Doctors Against Health Minister Take Action Hospital Sealed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top