जालना : गोदाकाठ झालाय दक्ष, ग्रामपंचायतीकडून गावागावांत दवंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna Godavari river basin full rain water

जालना : गोदाकाठ झालाय दक्ष, ग्रामपंचायतीकडून गावागावांत दवंडी

जालना - पैठण येथील जायकवाडी धरणासह विविध बंधाऱ्यांतून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदाकाठच्या ३८ गावांना दक्ष राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. आता पूर परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्‍यक असलेल्या साहित्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागही सज्ज झाले आहे. शिवाय गावागावांत दवंडी दिली जात असून ग्रामसेवक, तलाठी मंडळाधिकारी यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गोदावरी नदीवरील पैठण येथील जायकवाडी धरणात बुधवारी (ता.२०) दुपारपर्यंत ८१.०१ टक्के भरले असून २५ हजार ३२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने जायकवाडी धरणातून एक हजार ८८९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, पावसाळा अजून अडीच महिने शिल्लक असल्याने पुढील काळात धरणात पाण्याची आवक वाढली तर विसर्गही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या ३८ गावांना दक्षता बाळगण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत. शिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कक्ष ही चोवीस तास सुरू ठेवण्यात आला आहे.

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांनी चल मालमत्ता, चीजवस्तू, वाहने, जनावरे, पाळीव प्राणी व शेती अवजारे आदी साधन सामग्री सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, मंडळाधिकारी ग्रामसेवक यांना ही सुरक्षेच्या दृष्टीने जीवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासह मुख्यालयी राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊ दिले आहेत.

शिवाय पुर परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे सात इन्फ्लेटेबल रबर बोट, एक फायबर बोट, १६ इन्फ्लेटेबल लाईटनिंग टॉवर, शंभर लाईफ जॅकेट, शंभर लाईफ बोयो, दहा इंटिग्रेटेड हूड मास्क, दहा हेल्मेट, दहा फोल्डेबल स्ट्रेचर, दहा फायर सूट, दोन पोर्टेबल टेंट, चार कॉक्रिट कटर, चार छोटे वुडन कटर, प्रत्येकी एक मोठे वुडन कटर, क्राँक्रिट ड्रील मशिन, डार्ट गन, चार मेटल कटर, वीस मेगाफोन, १६ मनिला रोप, २४ नायलॉन रोप, दोन ब्रिदींग ॲप्रेटस सेट, दोन डायविंग सूट असे साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे. हे साहित्य जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन नगरपालिकेकडे जमा करण्यात आले आहे. त्यांच्याकडून आवश्‍यकता भासल्यास या साहित्या वापर केला जाणार आहे. पुढील अडीच महिन्याच्या काळात गोदावरी नदी काठावरील ३८ गावांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

दोन वेळा निर्माण झाली होती पुर परिस्थिती

पैठण येथील जायकवाडी धरणातून अडीच लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरू केल्यानंतर आठ तासांमध्ये जिल्ह्याच्या हद्दीत हे पाणी दाखल होते. गोदावरी नदीकाठच्या ३८ गावांना या पुराच्या पाण्याच फटका बसतो. आतापर्यंत दोन वेळा जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली होती. यात २००६ व २००८ या वर्षात गोदावरीला पूर आला होता.

पाच वर्षांत २३ जणांचा मृत्यू

मागील पाच वर्षात म्हणजे २०१७ पासून आजपर्यंत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात वर्ष २०१७ मध्ये एक, २०१८ मध्ये दोन, २०१९ मध्ये पाच, २०२० मध्ये दहा, २०२१ मध्ये चार तर २०२२ मध्ये एक जणाचा पुराच्या पाण्यात मृत्यू झाला होता. यंदा ता.२५ जून रोजी शिवणी नदीला अचानक आलेल्या पाण्याच्या लोढ्यांत शिवणी (ता.जि.जालना) येथील एक जण वाहून गेल्याने मृत्यू झाला होता.

या ३८ गावांना दक्षतेचा इशारा

गोदाकाठच्या गावांमध्ये अंबड तालुक्यातील गोरी, गंधारी, डोमलगाव, वाळकेश्‍वर, कुरण, गोंदी, गंगा चिंचोली, साष्टपिंपळगाव, बळेगाव, आपेगाव, शहागड, पाथरवाला बुद्रुक, हासनापूर, कोठाळा, इंदलगाव, साडेगाव तसेच घनसावंगी तालुक्यातील भादली, सिरसवाडी, राजाटाकळी, मंगरूळ, मुद्रेगाव, रामसगाव, गुंज, बानेगाव, सौंदलगाव, लिंगसेवाडी, उक्कडगाव, शिवनगाव, जोगलादेवी, भोगगाव, शेवता, कोठी, पांढरे वस्ती ( अंतरवाली टेंभी), श्रीपत धामलगाव तर परतूर तालुक्यातील गोळेगाव, संकनपुरी, सावंगी गंगा किनारा, चांगतपुरी, सावरगाव बुद्रुकचा समावेश आहे.

बंधाऱ्यांतील जलसाठ्यात वाढ

गोदावरी नदीपात्रावरील आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यातील जलसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे नदीपात्र पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पैठण तालुक्यातील आपेगाव उच्च पातळी बंधारा ९८.४१ टक्के भरलेला आहे. तर हिरडपुरी उच्च पातळी बंधाऱ्यातून गोदापात्रात पाच हजार ६६२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Web Title: Jalna Godavari River Basin Full Rain Water Alert 38 Villages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top