Jalna : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इच्छुकांची मोर्चेबांधणी

Jalna : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

मंठा : ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होताच तालुक्यातील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या सरपंचपदासाठी अनेकजण सरसावले आहेत. मात्र निवडणुकीला खर्च खूप लागणार असल्याने अनेकांच्या मनाची द्विधा स्थिती झालेली आहे.

स्वातंत्र्यानंतर समाज सुशिक्षित झाला. समाजात, देशात, राज्यात होणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी, राजकारण या बाबत चर्चा करून मत व्यक्त करू लागला. दिवसेंदिवस सर्वच बाबतीत बदल होत आहे. त्याचप्रमाणे राजकारणात देखील आज खूप बदल झाला आहे. आता पूर्वीसारखे समाजसेवेचे राजकारण खूप कमी झाले आहे. पूर्वी निवडणूक लढविण्याकरिता खर्च लागत नव्हता किंवा इतर मित्र परिवार उमेदवाराचा प्रचार व खर्च करीत होते. परंतु आता निवडणूक लढविण्याकरिता भरपूर खर्च करावा लागतो. शिवाय ग्रामपंचायतीमध्ये देखील पक्ष राजकारण आले आहे.

तालुक्यातील मुदत संपलेल्या ३५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होत आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्याकरिता गावागावातील इच्छुक उमेदवार निवडणूक लढवावी किंवा नाही याबाबत मतदाराशी चर्चा करून चाचपणी करीत आहेत. गावातील जुने जाणते राजकारणी ग्रामपंचायत निवडणुकीत काही तथ्य नाही. काही मिळत तर नाहीच लोकांची बोलणी खावी लागते, तसेच स्वतःचा कामधंदा बुडतो व खर्च देखील खूप होतो, त्यामुळे यावेळी निवडणूक लढविणार नाही, अशी चर्चा करून नव्याने राजकारणात येऊ पाहणाऱ्या इच्छुकांना सल्ला देत आहेत .

ग्रामीण भागात देखील साक्षरतेचे प्रमाण वाढल्याने तसेच टीव्हीवरील बातम्या कार्यक्रम यामुळे अनेक बदल झाले आहेत. पूर्वी आरक्षित जागेवर घरगडी किंवा शेतात काम करणारा उमेदवार निवडून आणून पूर्ण कारभार प्रस्थापितांच्या हातात राहत होता. परंतु आता आरक्षित जागेवर निवडून आलेला उमेदवार स्वतः निर्णय घेत असल्याने देखील राजकारणात बदल झाला आहे.

जुन्या राजकारणींबरोबरच तरुण मंडळी देखील मोठ्या उत्साहाने राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी पारावर किंवा ठिकठिकाणी गप्पा करताना मतदारांशी चर्चा करून निवडणुकीत खूप खर्च करणारा किंवा जवळचा, समाजाचा उमेदवार न पाहता गावाचा विकास करणाऱ्या उमेदवारास निवडून द्या. असे समजावून सांगताना दिसत आहे. तसेच राजकीय मंडळी देखील राजकीय वजन असलेल्या तरुणास आपल्या पक्षाकडून मदत मिळेल, तुम्ही निवडणुकीच्या तयारीला तयारीला लागा असे सांगत आहेत.