भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhokardan pipeline burst

भोकरदन शहरातून जाफराबादकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील केळणा नदीवरील पुलाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे

भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

भोकरदन (जि. जालना): भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी शहरातील केळणा नदी पात्रात पुलाच्या सुरू असलेल्या कामामुळे बुधवारी (ता.17) फुटली आहे. परिणामी अनेक भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

भोकरदन शहरातून जाफराबादकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील केळणा नदीवरील पुलाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामाला अडथळा ठरणारी नदी पात्रातील पाणी पुरवठ्याची जुनी मुख्य जलवाहिनी संबंधित कंत्राटदाराने तोडून दुसरीकडे अंथरली आहे. मात्र, हे काम योग्य रित्या होत नसल्याने ही जलवाहिनी वारंवार फुटत आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडित होत असून, नागरिकांना भर उन्हाळ्यात पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे.

वाशी पोलिसांची मोठी कारवाई, गांजासह ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गत वीस ते पंचवीस दिवसांपूर्वीही जलवाहिनी फुटल्याने तब्बल पंधरा दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद होता. त्यावेळी शहरवासियांतून मोठी ओरड झाल्यानंतर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी संबधित कंत्राटदारावर दबाव आणून काम तात्काळ करून घेतले. मात्र सदरील काम योग्य रित्या करण्यात आले नसल्यानेच पुन्हा जलवाहिनी फुटल्याचा आरोप नगरसेवक अब्दुल कदिर यांनी केला.

दरम्यान बुधवारी सांयकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख व काही संतप्त नगरसेवकांनी याठिकाणी जाऊन पुलाचे काम बंद पाडले. तसेच जलवाहिनी पूर्णपणे दुरुस्त होत नाही व शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा पवित्रा घेतल्याने संबधित कंत्राटदाराकडून तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. शुक्रवार पर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम होईल असे सांगण्यात आले.

उदगीर शहरात आता व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक

सतत जलवाहिनी फुटण्याचा प्रकार होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्ती होईपर्यंत पुलाचे काम सुरू करू देणार नाही. तसे संबंधित कंत्राटदारांना सांगितले असून, पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही सूचना केल्या आहे. - मंजुषा देशमुख, नगराध्यक्षा, भोकरदन
 

टॅग्स :CongressBhokar