जायकवाडी धरण भरले!; अर्ध्या मराठवाड्याला दिलासा

डॉ. माधव सावरगावे
रविवार, 15 सप्टेंबर 2019

आशिया खंडातील सर्वाधिक मोठे मातीचे धरण म्हणून जायकवाडी धरणाची ओळख आहे. मराठवाड्यात यंदाही भीषण दुष्काळाची, भयाण स्थिती आहे. पावसाळा उलटून चालला तरी सगळी धरणं, प्रकल्प कोरडेठाक आहेत. पाऊस नसल्यानं शेतकरी हवालदिल आहेत.

औरंगाबाद - आशिया खंडातील सर्वाधिक मोठे मातीचे धरण म्हणून जायकवाडी धरणाची ओळख आहे. मराठवाड्यात यंदाही भीषण दुष्काळाची, भयाण स्थिती आहे. पावसाळा उलटून चालला तरी सगळी धरणं, प्रकल्प कोरडेठाक आहेत. पाऊस नसल्यानं शेतकरी हवालदिल आहेत.

लातूर जिल्ह्यातील परिस्थिती हळूहळू गंभीर होत चालली आहे. तीच गत बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी या जिल्ह्याची आहे. पाऊस नसल्याने राजधानी औरंगाबादसह मराठवाड्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील बाजारपेठा ठप्प आहेत. यंदा पिण्यासाठीही पाणी मिळेल की नाही याचीही शाश्वती राहिली नाही. मात्र, नाशिक आणि नगर जिल्ह्यात पडलेल्या पावसाने जायकवाडी धरण यंदा पूर्ण भरले. या भरलेल्या जायकवाडीमुळे अर्ध्या मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. दुपारी गोदावरी नदीतून येणारी आवक लक्षात घेऊन जायकवाडी धरणाच्या नऊ आणि दहा नंबरचे दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात येणार आहेत. त्यातून नेमके किती पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे, याबाबत जायकवाडी पाटबंधारे विभागाचे नियोजन सुरू आहे.

जायकवाड़ी धरणातील पाण्याची सद्यस्थिती : 

1) जायकवाडी धरणाची पाणीपातळी : 1521.87 फुट ( 463.866 मीटर)
2) आवक :- 20258 क्युसेक 
3) एकूण पाणी साठा:- 2893.518 दलघमी
4) जिवंत पाणी साठा:- 2155.412 दलघमी
5) धरणाची टक्केवारी: 99.51%
6) उजवा कालवा विसर्ग :-700 क्यूसेक
7) डावा कालवा विसर्ग :- 400 क्युसेक्स
8) पैठण जलविद्युत केंद्रातून विसर्ग :- 1589 क्यूसेक्स

नगर, नाशिक जिल्ह्यातील पडत असलेला पाऊस आणि आवक लक्षात घेऊन दरवाजातून पाणी किती सोडायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या डाव्या, उजव्या कालव्यासोबत धरणावरील वीज निमिर्ती केंद्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संध्याकाळपर्यंत पाणी सोडण्याबाबतचे नियोजन सुरू आहे. यापूर्वी गोदावरी खोऱ्यातील बंधाऱ्यामध्ये १९७ दलघमी म्हणजे ७ टीएमसी पाणी साठवण्यात आले आहे. माजलगाव धरणातही अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करून पाणी सोडण्याचे नियोजन सुरू आहे. 
- राजेंद्र काळे, मुख्य अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayakwadi dam is full