esakal | बाजार बंदच्या सूचना देताच संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला; आडगाव येथे आठवडी बाजारातील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

In Jintur angry farmers have thrown vegetables on the road as soon as the market closure was announced.jpg

तालुक्यातील अनेक ठिकाणचे तसेच परिसरातील १०-१५ गावामधील लहानलहान व्यापारी, शेतकरी भाजीपाला व शेतमालाच्या विक्रीसाठी येथील बाजारात येतात. 

बाजार बंदच्या सूचना देताच संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला; आडगाव येथे आठवडी बाजारातील प्रकार

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर (परभणी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहणीसाठी आलेल्या पथकाने बाजार बंद करण्याच्या सूचना करताच दैनंदिन जीवनातील समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा सवाल करत विक्रीसाठी आणलेला भाजीपाला पथकासमोरच रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला. हा प्रकार घडला शनिवारी (ता.२७) जिंतूर तालुक्यातील आडगाव-बाजार येथील आठवडी बाजारात.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी खबरदारीच्या उपाययोजनांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आडगाव हे तालुक्यातील शहरी गाव असून औंढा-जिंतूर तालुक्याच्या हद्दीवरचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शनिवार येथील आठवडी बाजारचा दिवस आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणचे तसेच परिसरातील १०-१५ गावामधील लहानलहान व्यापारी, शेतकरी भाजीपाला व शेतमालाच्या विक्रीसाठी येथील बाजारात येतात. 

त्यामुळे आदेशाच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या सुचनेवरून नायब तहसीलदार परेश चौधरी, मंडळ अधिकारी प्रशांत राखे, तलाठी नितीन बुड्डे, शेख अकबर यांच्यासह इतर महसूल कर्मचारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक चौरे, बिट जमादार दुधाटे यांचे पथक बाजारात आले असता बाजारात नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने पथकातील अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना बाजार बंद असल्याबाबत सुचना दिल्या. त्यामुळे अगोदरच शेतीसह अनेक प्रापंचिक समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्या. त्यांनी शासन व प्रशासनाच्या धोरणावर आक्रमक होत जगायचे कसे ते सांगा? असा सवाल करून विक्रीसाठी आणलेला भाजीपाला पथकासमोरच रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला. यावेळी भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्यांचा रूद्रावतार पाहून पथकाने तेथून काढता पाय घेतला.

loading image