esakal | जिंतूर : नुकसान ३४ हजार हेक्टरचे तरीही पैसेवारी ५३ टक्के 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात २०-२२ सतत पाऊस पडला.त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात अतिवृष्टी झाली.

जिंतूर : नुकसान ३४ हजार हेक्टरचे तरीही पैसेवारी ५३ टक्के 

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर  (जिल्हा परभणी) : यावर्षी सततचा पाऊस, अतीव्रष्टी व पुरामुळे  जिंतूर तालुक्यात जवळपास ३४ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले. तरीही तालुक्याची पैसेवारी ५३ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले.

ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात २०-२२ सतत पाऊस पडला.त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी,नाले,ओढे यांना आलेल्या पुराचे पाणी काठच्या शेतात शिरले, सखल जमिनीतही पाणी साचले त्यामुळे मूग,उडीद, सोयाबीन,कापूस, तूर यासह सर्वच खरिप पिकांचे अतोनात नुकसान झाले. महसूल, पंचायत समिती व क्रषी विभागातर्फे पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.त्यावरून १६९ गावांपैकी ११२ गावांतील ४० हजार ११२ शेतकऱ्यांच्या ३३ हजार ९६७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्के नुकसान झाल्याचे आढळून आले (प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त नुकसान झाले) याबाबत स्थानिक प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे अहवाल पाठवून नुकसानभरपाईसाठी  २३ कोटी १० लाख ६५ हजार रुपये निधीची मागणी केली.

हेही वाचा - रेल्वेकडून गुड न्यूज : उत्सव काळात नांदेड रेल्वे विभागाकडून ११ रेल्वे सुरु -

असे असताना तहसील कार्यालयातर्फे

ऑक्टोबर अखेर जाहीर केलेल्या सुधारित पैसेवारीनुसार तालुक्यातीची पैसेवारी ५३.१८ टक्के दर्शविली. तालुक्यातील सहा महसूल मंडळात पेरणी केलेल्या ८५ हजार ७२७ हेक्टर पैकी ८३ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हि पैसेवारी असून यात जिंतूर वगळता पाच मंडळांची आनेवारी ५२ ते ५४ टक्के दर्शविली आहे.वास्तविक  सावंगी (म्हाळसा),बामणी मंडळातील बहुतांश गावांमधील शेती येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असल्याने अद्यापही अनेक ठिकाणी पूर्णेचे पाणी शेतात साचलेले दिसते.बोरी मंडळात देखील अनेक गावांचे लागवड क्षेत्र करपरा,दुधना व त्यांच्या उपनद्यांच्या किनारी आहे.शिवाय इतर मंडळातही स्थानिक नद्या,नाले,ओढ्या काठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतशिवार आहे. त्यामुळे अतिवृष्टीने सर्वत्र मोठी पिकहानी होऊनही पैसेवारी ५३-५४ टक्के दर्शवण्यात आल्याबद्दल शैतकऱ्यांसह विविध क्षेत्रातील नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

  सदरील पैसेवारी हि सुधारित असून डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी घोषित होणार असल्याने त्यातून वास्तव चित्र स्पष्ट होईल असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अंतिम पैसेवारीची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे