जिंतूरची लेक अंजली कोला 'मिसेस एशिया युनिव्हर्स'ची मानकरी; जगभरातून आलेल्या ६० महिलांमध्ये पटकावले अव्वल स्थान

file photo
file photo

जिंतूर (जिल्हा परभणी) : शहरातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेली अंजली संपत कोला-पोर्जे हिने मेहनतीला आपले कर्म मानून राजस्थानमधील जयपूर येथे मिसेस युनिव्हर्स प्रा. लि. तर्फे नुकतेच घेण्यात आलेल्या ब्युटी पिजंट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पाचव्या श्रेणीत जगभरातून आलेल्या ६० विवाहित महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावून 'मिसेस एशिया युनिव्हर्स २०२१'च्या किताबाचा क्राऊन माथी सजवून घेण्यात यश प्राप्त करुन 
सबंध एशियामध्ये जिंतूर तालुक्याच्या नावलौकिकात मनाचा तुरा रोवला आहे.

शहरातील एकलव्य बालविद्या मंदिर विद्यालयात शालेय व ज्ञानोपासक महाविद्यालयात उच्चमाध्यमिक तर औरंगाबाद येथे उच्च शिक्षण घेत असलेल्या अंजली कोला- पोर्जे हिस शालेय जीवनापासूनच फॅशन जगाचे आकर्षण होते. २००९ साली तिचे लग्न औरंगाबाद येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअर संपत पोर्जे यांच्यासोबत झाल्यानंतर तिच्या स्वप्नांना पंख फुटण्यास सुरुवात झाली. अन् वयाच्या २१ व्या वर्षीपासून मॉडेलिंग, फॅशन, ग्रुमिंग ट्रेनर आणि इव्हेन्टच्या क्षेत्रात तिने प्रत्येक्षात पदार्पण करुन औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी ५० पेक्षा जास्त वेळेस ब्युटी पिजंट स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून यशस्वी भूमिका निभावून फॅशनच्या विश्वात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याचबरोबर ईटीव्ही मराठी वाहिनीवरील 'मेजवानी किचन क्वीन' व 'आम्ही सारे खवय्ये' सारखे रियालिटी शोच्या किताबावर आपल्या नावाचा शिक्कामोर्तब केला. 

अंजलीने प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आणि मेहनतीवर मिळविले यश

अंजलीच्या अद्वितीय कार्याची दखल घेऊन अभिनेता अमन शर्मा यांच्या हस्ते इंटरप्रेन्युअर वुमन्स अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इथेच न थांबता अंजलीने प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आणि मेहनतीला आपले कर्म मानून सलग आठ महिने प्रयत्नांची पराकाष्ठा ओलांडून राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित मिसेस युनिव्हर्स प्रा. लि. तर्फे ब्युटी पिजंट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला. मिसेस युनिव्हर्सच्या पाचव्या श्रेणीत जगभरातून ६० विवाहित महिलांनी सहभाग नोंदविला होता. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या ग्रँड फिनालेसाठी पाच महिलांची निवड करण्यात आली होती. शेवटी अंजलीने या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावून 'मिसेस एशिया युनिव्हर्स २०२१' च्या किताबाचा क्राऊन माथी सजवून घेण्यात यश प्राप्त केले. तिच्या या अद्वितीय यशामुळे एशियामध्ये जिंतूर तालुक्याच्या नावलौकिकात मनाचा तुरा रोवला गेला आहे.

विवाहित महिलांच्या इच्छा आकांक्षाना बळ देणार

वैवाहिक जीवनात महिलांना अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे इच्छा असूनसुद्धा त्यांच्यामधील विविध कला कौशल्यास वाव मिळत नाही. परिणामी कर्तुत्ववान महिलांना कला क्षेत्रापासून वंचित रहावे लागते. म्हणून उराशी अशा इच्छा आकांक्षा बाळगणाऱ्या महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देऊन त्यांच्यामधील कला कौशल्याला बळ देण्याचे काम हाती घेणार आहे. 
- अंजली कोला-पोर्जे, मिसेस एशिया युनिव्हर्स 

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com