कधीच लुप्त झाली नव्हती अजिंठा लेणी 

संकेत कुलकर्णी
रविवार, 28 एप्रिल 2019

लेणीचे नाव "अजिंठा'च होते का? 
जॉन स्मिथ अजिंठ्यात मुक्कामी राहिला. तेथूनच वाटाड्याच्या मदतीने वाघूर नदीच्या खोऱ्यातील जंगलात तो शिरला. मात्र, लेणीपासून अजिंठा हे गाव किमान 15 किलोमीटर लांब आहे. शिवाय या गावाच्या नावाचा लेणीशी काही संबंध असेल, असे वाटत नाही.

औरंगाबाद : कॅप्टन जॉन स्मिथने अजिंठा लेणी शोधून काढली, असे म्हणणे अर्धसत्य आहे. ही लेणी कधीच लुप्त झाली नव्हती. स्थानिकांना लेणीबद्दल माहिती होतीच. मात्र, हे अद्वितीय चित्रशिल्प जगाच्या नकाशावर आणण्याचे, पाश्‍चात्य अभ्यासकांपर्यंत पोचविण्याचे श्रेय मात्र निर्विवाद जॉन स्मिथ आणि त्यानंतरच्या इंग्रज अधिकाऱ्यांना द्यावे लागेल, असे काही पुरातत्त्वज्ञांचे मत आहे. 

सातव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी ह्यू एन त्संग याच्या लिखाणात या लेणीबद्दल सर्वप्रथम उल्लेख आला आहे. त्यानंतरही येथे अनेक घडामोडी घडल्या. शिवाय सतराव्या शतकात मुघल बादशहा औरंगजेबाची थोरली मुलगी झेबुन्निसा हिने आपल्या रोजनिशीत अजिंठा लेणीबद्दल लिहिल्याचे उल्लेख आहेत. अठराव्या शतकापासून अजिंठा हे निजामी राज्याच्या सीमेवरील गाव होते. गावाला चोहोबाजूंनी तटबंदी होती. सरकारी दस्तावेजांमध्ये अजिंठ्याचे नाव होते. निजामाच्या राज्यात स्वतंत्र पुरातत्त्व खाते होते. त्यामुळे ही लेणी कुणाला माहिती नव्हती आणि सर्वप्रथम जॉन स्मिथनेच शोधून काढली, असे म्हणता येणार नसल्याचे मत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे उपअधीक्षक डॉ. शिवाकांत बाजपेयी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

लेणीचे नाव "अजिंठा'च होते का? 
जॉन स्मिथ अजिंठ्यात मुक्कामी राहिला. तेथूनच वाटाड्याच्या मदतीने वाघूर नदीच्या खोऱ्यातील जंगलात तो शिरला. मात्र, लेणीपासून अजिंठा हे गाव किमान 15 किलोमीटर लांब आहे. शिवाय या गावाच्या नावाचा लेणीशी काही संबंध असेल, असे वाटत नाही. याउलट लेणीपासून जवळच नामसाधर्म्य सांगणारे "लेणापूर' नावाचे गाव आहे. त्यानंतरचे जवळचे गाव "फर्दापूर' आहे. मग ही अजिंठा लेणी कशी? इंग्रज अधिकाऱ्यांचे अजिंठा गावात वारंवार पडलेले मुक्काम आणि त्या काळातील मोठे आणि तुलनेने प्रसिद्ध गाव असल्यामुळेच ही लेणी अजिंठा लेणी म्हणून ओळखली गेली असावी, असा तर्क डॉ. वाजपेयी यांच्यासह आजवर अनेकांनी मांडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: John Smith found Ajintha caves in Aurangabad