हिंगोलीत पतंगोत्सवाचा लुटला आनंद

राजेश दारव्हेकर
बुधवार, 15 जानेवारी 2020


हिंगोली शहरात मकरसंक्रातीला पंतग परंपरा आहे. शहरात किमान सात ते आठ हजार पतंगाची विक्री झाल्याचे विक्रेते सांगत आहेत. दिवसभर ठिकठिकाणी गाण्यांच्या तालावर ठेका धरत बच्चे कंपनीसह युवकांनी पतंगोत्सवाचा आनंद लुटला.

 

हिंगोली : शहरात मकरसंक्रातीनिमित्त पंतग उडविण्याची अनेक वर्षांची परंपरा असून बुधवारी (ता.१५) गाण्याच्या तालावर ठेका धरत युवकांसह बच्चे कपंनीने कटी, लगी असे म्‍हणत पतंग उडविण्याचा आंनद लुटला. तसेच तिळगुळाचे वाटप करत तिळगूळ घ्या... गोड गोड बोला म्हणत मकरसंक्रात सण साजरा केला.

हिंगोली शहरात मकरसंक्रातीला पंतग उडविण्याला महत्‍व आहे. बुधवारी (ता.१५) मकरसंक्रातीचा सण असल्‍याने अनेकांनी पतंग व त्‍यासाठी लागणारा मांजा खरेदी केला. पतंगाच्या दुकानावर मोठी गर्दी झाल्याने विक्रेत्‍याचा चेहरा देखील दिसत नव्हता. शहरात किमान सात ते आठ हजार पतंगाची विक्री झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.

हेही वाचा...मकर संक्रांत विशेष : कशासाठी आहे हा सण वाचा सविस्तर ​

पतंग उडविण्यात मग्न

दरम्यान, मकरसंक्रातील शाळेला सुट्टी नसतानाही अनेक विद्यार्थ्यांनी घरीच राहणे पसंत केले.
शहरातील तलाब कट्टा भागातील पुरुषोत्तम पांडे यांच्या घराच्या गच्चीवर पंतग उडविण्यासाठी विशेष व्यवस्‍था करण्यात आली होती. येथे नास्‍त्‍याचा आस्‍वाद घेत पतंग उडविण्यात युवक मग्न झाले होते. दहा ते बारा वर्षांपासून त्‍यांच्या घराच्या गच्चीवर पतंग उडविण्यासाठी युवक एकत्र येतात. तसेच शहरात अनेक ठिकाणी देखील नास्‍ता व डीजेची व्यवस्‍था करण्यात आली होती.

बच्चे कंपनीची धावपळ

या वेळी पंतगावर आधारीत गिते लावण्यात आली. ‘चली चली रे पतंग मेरी चली रे, चढा ओढीने चढवीत होते, बाई मी पतंग उडवीत होते’, तसेच ‘तीळ गुळ घ्या हो, गोड गोड बोला’ यासह रिमिक्‍स गितांवर युवकांनी ठेका धरत पतंग उडविण्याचा आनंद लुटला. काही बच्चे कपंनी दिवसभर पळापळीत मग्न होते. लगी, कटी, भाग असे आवाज देत एकच कल्‍लोळ गल्‍लोगली पाहवास मिळत होता. अनेकांना कटलेला पतंग पकडताना हाताला जखमा देखील झाल्‍या. मात्र, याकडे दुर्लक्ष करत पतंग उडविण्याचा आनंद लुटला.

हेही वाचा... अशोक चव्हाणांचा पतंग आकाशी... ​

तिळगूळ घ्या.. गोड गोड बोला...

बुधवारी जिल्हाभरात मकरसंक्रांतीनिमित्त महिलांनी हळंदकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रुक्मिणी मातेला वाण देण्याला विशेष महत्त्‍व असल्‍याने शहरातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात जावून प्रथम रुक्मिणी मातेला वाण देण्यात आले. त्यानंतर जमलेल्या महिलांना वाण देण्यात आले. त्यानंतर वाण देण्यासाठी महिलांनी रांगा लावल्या होत्या. वाणाच्या साहित्‍यात बोर, बिबा, पेरू, वाटाणा, भुईमुगाच्या शेंगा, ऊस, हरभऱ्याचा टहाळ, हळदीकुंकू, तिळगूळ तसेच वाणासाठी असलेल्या वस्‍तूंचा यात समावेश होता. यावेळी एकमेंकिंना तीळगुळाचे वाटपही करण्यात आले.

 

पाणी, नास्‍त्याची व्यवस्‍था

बारा वर्षांपासून आमच्या गच्चीवर पतंग उडविण्यासाठी मित्रमंडळीसह युवक एकत्र येतात. त्‍यांना पाणी व नास्‍त्याची व्यवस्‍था करून दिली जाते. पतंग उडविण्याचा आनंद घेतला जातो. बुधवारी एक जण किमान वीस ते पंचवीस पतंग घेवून आले होते.

-पुरुषोतम पांडे

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The joy of kite festival in Hingoli