'या' गावात १०० वर्षांपासून मटण चिकनला नाही एन्ट्री...कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Jyotibachi Wadi in Bhum taluka village.jpg
Jyotibachi Wadi in Bhum taluka village.jpg

पुणे : अनेकजण श्रावणात मांसाहार करत नाहीत. काही ठराविक दिवस सोडले तर बाकीच्या दिवशी हमखास त्यांचा मांसाहार ठरलेला असतो. मात्र सध्या पूर्वीसारखं शाकाहार अन्‌ मासांहार असे काही सर्वजण पाळत नाहीत. अनेक गावात मासांहारी जेवण खाल्लं जात आहे. पण तुम्हाला माहितीय का...? आपल्या महाराष्ट्रातील एक गाव हे फक्त शाकाहारी गाव म्हणून ओळखले जाते. तुम्हाला हे ऐकून काहीतरी नवल वाटेल, बरोबर ना...पण हे खरं आहे. त्याच गावाबद्दल आपण जाणून घेऊयात. 

उस्मानाबाद जिल्हयातील भूम तालुक्यात ज्योतिबाची वाडी हे एक गाव आहे. भूमपासून २७ किलोमीटरवर दोन हजार लोकसंख्येचे हे गाव आहे. या गावात श्रावणातील तिसऱ्या रविवारी सर्वात मोठा उत्सव असतो. त्यासाठी पंचक्रोशीतून हजारो भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे ज्योतिबाच्या वाडीला यात्रेचे स्वरूप येते. यात्रेत लेझीम पथक, त्यामागे पालखी असते. पूर्वी या उत्सवात नृत्यांगणा असायच्या पण आता नसतात. 

म्हणून गावाचे हे नाव पडले... 

गावाचे ग्रामदैवत ज्योतिबा आहे. देवाच्या नावावरूनच गावाचे नाव ज्योतिबाची वाडी पडले, असे गावातील लोक सांगतात. दररोज मंदिरात होत असलेल्या भजनात गावकरी सहभागी असतात.

गावात ही आहेत मंदिरे... 

या गावात ज्योतिबा, महादेव, यमाई, मारुती, विठ्ठल- रूक्मिणी ही मंदिरे आहेत. गावाजवळच तीन किलोमीटरवर असलेल्या बेलेश्वर येथे पुरातन देवस्थान आहे.

या गावातील उत्सव...  

या गावात मोठा उत्सव दसऱ्याला, चैत्र पौर्णिमेला व श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी भरतो. चैत्र पौर्णिमेला सर्वात मोठी यात्रा भरते. यात्रेचे महात्म्य कायम राखण्यासाठी धार्मिक नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी भरणारी यात्रा ही रद्द करण्यात आली आहे. यात्रेला अहमदनगर, उस्मानाबाद, बीड या ठिकाणांहून लाखो भाविक येतात. ज्योतिबास पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो. 

गावकऱ्यांची उपजीविका... 

बालाघाटाच्या डोंगर कुशीत गाव आसल्याने येथील गावकऱ्यांची उपजीविका शेतीवर आहे. तसेच, पशुपालन हा जोड व्यवसायही मोठ्या प्रमाणावर केला जातो. गावात रोज दैनंदिन पाच ते सात हजार लिटर दुध संकलन केले जाते. येथे एक दूध डेअरी आहे. गावात २०-२५ खवाभट्टी आहेत. गावात खव्यापासून बनवला जाणारा पेढा हा प्रसिद्ध पदार्थ आहे.

म्हणून गावकरी शाकाहारी आहेत... 

पत्रकार अब्बास सय्यद म्हणाले, ज्योतिबाचे मंदिर बालाघाट डोंगररांगांच्या कुशीत वसले आहे. गाव कित्तेक वर्षांपासून शाकाहारी आहे. गावातील रहिवासी मांसाहार करत नाहीत. ज्योतिबाच्या मंदिरामुळे गावकऱ्यांनी शाकाहारी राहण्याची परंपरा पाळली आहे. त्यामागे एक कहाणी आहे, असे गावातील जाणकार लोक सांगतात. ज्योतिबा मंदिर देवस्थान कोल्हापूरच्या ज्योतिबाचे ठाणे म्हणून ओळखले जाते. येथील देवास मांसाहार चालत नाही, म्हणून गावकरीही मांसाहार करत नाहीत. शाकाहारी राहण्याची ही परंपरा अनेक वर्षांपासून या गावात सुरु आहे.

गावातील जेष्ठ नागरीक महारुद्र वरबडे म्हणाले, ज्योतिबाचे मंदिर जागृत असल्यामुळे गावात कोणी कोंबडे व बकरे कापलेले नाही. ज्योतिबावर असलेली श्रद्धा अशी चालत आली आहे. या गावात शाकाहाराची परंपरा पिढीना पिढी सुरू आहे. पण त्याचा कोणी गवगवा करत नाहीत. ज्योतिबाची वाडी हे निजाम राजवटीतील गाव. परंतु येथील जोतिबाच्या जागृत मंदिराच्या भयाने रझाकारांनी त्या गावाला त्रास कधीही दिला नाही. गावात काही जण माळकरी आहेत. ऊर्वरित जे काही लोक आहेत, त्यांपैकी मांसाहार करणारे दोन टक्के लोक निघतील. त्यांना मटण खाण्याची इच्छा झाल्यास ते परगावी नातेवाइकांकडे किंवा शहरातील हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार करतात. मात्र ते लोक गावात आंघोळ करूनच येतात. पुणे - मुंबई येथे स्थायिक झालेले गावातील लोकही गावी आल्यावर मांसाहार करत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com