तिसरीतील मुलीनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून म्हटलं... 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात फसगत झालेल्या आपल्या वडिलांवरील संकट दूर करा, अशी आर्त साद तालुक्‍यातील देवळाली येथील तिसरीतील मुलीने मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्राद्वारे घातली आहे.

कळंब (जि. उस्मानाबाद) : कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात फसगत झालेल्या आपल्या वडिलांवरील संकट दूर करा, अशी आर्त साद तालुक्‍यातील देवळाली येथील तिसरीतील मुलीने मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्राद्वारे घातली आहे.
 
विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला वाव मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या देवळाली येथील प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक मारुती खुडे यांनी मान्यवरांना शुभेच्छापत्र लिहिण्याचा उपक्रम सोमवारी (ता. 20) राबविला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम होता.

तिसरीच्या वर्गात 33 विद्यार्थी-विद्यार्थिनी असून, शेतकरी, शेतमजूर अशा कष्टकऱ्यांची ही मुले आहेत. काही विद्यार्थ्यांनी अधिकारी, पदाधिकारी, काहींनी देश, राज्यपातळीवरील मोठ्या पदांवरील नेत्यांना शुभेच्छापत्रे लिहिली. ती एकत्रित करून खुडे हे वाचन करीत होते. त्यावेळी धनश्री आश्रुबा बिक्कड या मुलीचे पत्र वेगळे दिसले.

आंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत? चला औरंगाबादला! 

या पत्रात धनश्रीने प्रजासत्ताक दिनाच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत आपल्या वडिलांची व्यथा मांडली. कडकनाथ कोंबडी प्रकरणात वडिलांची फसगत झाली असून मदत करा, असे तिला म्हणायचे आहे. पत्र वाचून गहिवरलेल्या खुडे यांनी तिचे पालक आश्रुबा बिक्कड यांच्याशी संपर्क साधला व त्यांना पत्र दाखविले. आश्रुबा यांचेही मन भरून आले. 

घाटी रुग्णालयात मिळणार माणुसकीचा हात 

धनश्रीच्या पत्राचा आशय

साहेब, माझे पप्पा शेतकरी आहेत. आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीच्या वेळी पाऊसच पडत नाही. मग शेतात काहीच धान उगवत नाही. यामुळे पप्पा सारखं टेन्शनमध्ये असतात. चिडचिड करतात. आई, माझ्यावरही चिडतात. "त्या कडकनाथ घोटाळ्यानं वाटोळं केले. कडकनाथ घोटाळ्यात लय पैसे अडकलं. मरणाशिवाय आता दुसरा पर्याय नाही' असं सारखं बोलत राहतात. साहेब, मला लयं घाबरायला होतं. शेतकरी आत्महत्येच्या बातम्या पेपरात येतात. मला फार भीती वाटते. साहेब, आमच्या पप्पाला तुम्ही समजून सांगा. कडकनाथ कोंबड्यांसाठी त्यांनी दिलेले पैसे त्यांना परत मिळवून द्या. माझ्या पप्पाला मदत करा... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadaknath Poultry Scam Osmanabad Uddhav Thackeray News