चिमुकल्यांची व्यथा! 'कोरोनामुळे खूप नुकसान झालंय'

केतन ढवण
Tuesday, 26 January 2021

या विषयावर विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने शाळा बंद असतानाचे अनुभव लिखाणाच्या माध्यमातून कागदावर मांडले

उजनी (लातूर): 'शाळा चालू असताना खूप अभ्यास होत होता पण कोरोनामुळं सगळं बंद पडल्यामुळे अभ्यास होत नसून आमची प्रगती बंद पडली आहे. आमचं अभ्यासाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. मोबाईलवर शिकवल्यालं समजत नाही. शाळेतील मित्र, मैत्रीण, शिक्षक, झाडे, शाळेचा परिसर आदींची खुप आठवण येतेय' ही व्यथा इयत्ता ३ री ते ५ इयत्तेत शिकत असलेल्या चिमुकल्यांनी निबंधातून मांडली.

टाका (ता. औसा) येथील अक्षरधारा प्रायमरी इंग्लिश शाळेत मंगळवारी (ता.२६) प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त साधून इयत्ता तिसरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  स्पर्धेसाठी 'कोरोनामुळे माझ्या शिक्षणावर झालेला परिणाम' हा विषय देण्यात आला होता.

या विषयावर विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने शाळा बंद असतानाचे अनुभव लिखाणाच्या माध्यमातून कागदावर मांडले. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना शाळेतील दैनंदिन उपक्रम, अभ्यास आदी सर्व गोष्टींची आठवण येत असून कोरोना मुळे आमच्यावर मनावर मोठा आघात झाल्याचे विद्यार्थ्यांनी निबंधात सांगितले.

येथील विश्र्वा भोई ही विद्यार्थिनी सांगते, कोरोनामुळे शाळा बंद पडल्या म्हणून माझे शिक्षण बंद पडले. त्यामुळे माझी प्रगती बंद पडली. शाळा सुरू असताना माझा खूप अभ्यास होत होता.आता मजा येत नाही. माझी इच्छा आहे की कोरोना थांबावा, कोरोनामुळे लोक मृत्यू पावत आहेत. कोरोना... कोरोना.. कोरोना रोज बातम्या येत आहेत.

स्नेहा शिंदे लिहते, कोरोनामुळे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. स्वच्छ हात धुने, स्वच्छता राखणे मात्र दहावी व बारावीमधील विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले. त्याचबरोबर विद्यार्थी आदित्य शिंदे लिहितो की, कोरोनामुळे सर्वांची शिस्त व सवयी बदलल्या, राहणीमान बदलले. लिहायचं वाचायचं विसरत चाललं आहे. अशाप्रकारे येथील विद्यार्थ्यांनी लॉकडाउनच्या काळातील अनुभवलेल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

"कोरोना संसर्गाचा सर्वात मोठा फटका हा शिक्षण क्षेत्राला बसला आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, मनावर काय परिणाम झाले? या काळातील त्यांचे अनुभव, त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील बदल, यामधून शिकलेल्या गोष्टी आदी प्रश्नावर विद्यार्थ्यांना मनमोकळेपणाने व्यक्त होता यावे, त्यांच्या मनातील भावना समजून घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते." 

- दत्तात्रय शिंदे, मुख्याध्यापक, अक्षरधारा प्रायमरी इंग्लिश स्कूल, टाका

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kids writing essay on corona virus period and their loss during corona