कोल्हापुरी बंधाऱ्याने १९४ एकरांवरील क्षेत्र सुजलाम् ...

राजाभाऊ नगरकर
Monday, 30 March 2020

 जिंतूर  (जि. परभणी) तालुक्यातील माथला व पाचेगाव शिवारात दोन कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात येत आहे. या बंधाऱ्यांमुळे परिसरातील १९४ एकर क्षेत्र शेतजमिनीला सिंचनासाठी लाभ होण्याची शक्यता आहे.
 

जिंतूर (जि. परभणी) : जिंतूर तालुक्यातील माथला व पाचेगाव शिवारात दोन कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात येत आहे. या बंधाऱ्यांमुळे परिसरातील १९४ एकर शेतजमिनीला सिंचनासाठी लाभ होण्याची शक्यता आहे.

माथला येथे गावाजवळील व पाचलेगाव शिवारात असलेल्या मोठ्या नाल्यात साचलेले पावसाचे पाणी वाहून जाते. ते शेतीसाठी उपयोगात आणण्यासाठी आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांच्या पाठपुराव्याने ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेनुसार महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबादअंतर्गत जालना जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने परभणी उपविभागातर्फे सुमारे दोन कोटी खर्चाच्या दोन्ही ठिकाणांच्या बंधाऱ्यांचे काम ज्योती कन्स्ट्रक्शन एजन्सीमार्फत हाती घेण्यात आले. यापैकी माथला येथील बंधाऱ्याचे काम खोलीकरणासह पूर्णत्वास आले असून पाचेगाव शिवारातील बंधाऱ्याचे काम प्रगतिपथावर असून कामाची गती पाहता ते महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

प्रथमच पाणीसाठा उपलब्ध होणार
प्रत्येकी साठ फूट रुंदीचा बंधारा सहा गाळ्यांचा असून प्रत्येकी पाणीसाठवण क्षमता ९७ टीएमसी असून प्रत्येकी सिंचन क्षमतेचे उद्दिष्ट ७३ एकर आहे. या भागातील शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने कोल्हापुरी बंधारे पूर्ण होऊन कार्यान्वित झाल्यावर तसेच निसर्गाने साथ दिल्यास माथला, पांगरी, पाचेगाव येथील शेतकऱ्यांच्या परिसरातील जवळपास दीडशे एकर शेती सिंचनासाठी प्रथमच पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. शिवाय आसपासच्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्याची आशा आहे.

हेहीवाचा - जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी साधला संवाद

आमदार बोर्डीकर यांनी दिली ठेकेदारांना तंबी
जिंतूर तालुक्यात शेतीसाठी सिंचन व्यवस्था कमी आहे. त्यामुळे फळबागा कमी आहेत. अपेक्षित पीक उत्पादन निघत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. पावसाळ्यात ग्रामीण भागातील ओढ्या-नाल्यांचे पाणी वाहून जाते. तेंव्हा वाहून जाणारे पाणी जागीच जिरवून शेतीची उन्नती साधावी, शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी मी व्यक्तीश: शासनाकडे पाठपुरावा करून तालुक्यातील माथला, पाचलेगाव, केहाळ, धमधम कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांना मान्यता मिळवून त्यासाठीचा निधी उपलब्ध करून घेतला. जवळपास सर्व कामे प्रगतिपथावर असून पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, असा विश्र्वास असल्याचे सांगून जलसंधारणाच्या कोणत्याही कामांच्या बाबतीत कसलीही तक्रार सहन करणार नाही, अशी तंबी आमदार मेघना साकोरे यांनी ठेकेदारांना दिली.

सिंचनासाठी लाभ होईल
 बंधाऱ्यात अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध झाल्यास आमच्या गावपरिसरातील जवळपास शंभर एकर क्षेत्रास सिंचनासाठी लाभ होईल. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांचे हाल होणार नाहीत.
- सुदामराव डुकरे, शेतकरी, पांगरी 
 

हेहीवाचा - आडळकरांनी घडविले माणुसकीचे दर्शन

पाणीटंचाई मंदावण्याची आशा
बंधाऱ्यातील पाणीसाठ्यामुळे पिकांसाठी पाण्याची सोय होऊन पीक उत्पादनात निश्चितच वाढ होईल. शिवाय उन्हाळ्यात पशू - पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय होईल. गावची पाणीटंचाई मंदावण्याची आशा आहे.
-एकनाथ शेषराव भोंबे, शेतकरी, माथला
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Kolhapuri Dam swells over an area of ​​194 acres,parbhani news