सगळ्यात भारी कोथिंबीरी, शेतकऱ्यांना मिळून देई लाखो रुपयांचे उत्पन्न

केतन ढवण
Saturday, 29 August 2020

भारत हा कृषिप्रधान देश असून देखील देशातील शेतकरी हा कायम आर्थिक विवंचनेत असलेला दिसून येतो. यासाठी शासनाचे कृषिक्षेत्रा संदर्भातील उदासीन धोरणे कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून उजनी (ता.औसा) येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असलेल्या कोथिंबीर पिकातून मोठ्या प्रमाणावर परिसरातील शेतकरी उत्पन्न मिळवत असल्याचे दिसून आले आहे.

उजनी (जि.लातूर) : भारत हा कृषिप्रधान देश असून देखील देशातील शेतकरी हा कायम आर्थिक विवंचनेत असलेला दिसून येतो. यासाठी शासनाचे कृषिक्षेत्रा संदर्भातील उदासीन धोरणे कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून उजनी (ता.औसा) येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असलेल्या कोथिंबीर पिकातून मोठ्या प्रमाणावर परिसरातील शेतकरी उत्पन्न मिळवत असल्याचे दिसून आले आहे.

या वर्षी जून महिन्याच्या सुरवातीपासून चांगला पेरणी योग्य पाऊस झाल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन यांसारख्या पारंपरिक पिकांना प्राधान्य दिले. परंतु या वर्षी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पीक उगवले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. यातील अनेकांनी सोयाबीनची दुबार पेरणी न करता कोथिंबीर पिकाची लागवड केली. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी जून, जुलै, ऑगस्टमध्ये कोथिंबीर पिकाचे उत्पादन घेतले. त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून त्यांनी यामधून लाखो रुपये उत्पन्न मिळवले असल्याचे पाहायला मिळत आहे.

उदगीर पंचायत समितीची सत्ता भाजपकडून विरोधकांकडे गेली कशी ?

त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उजनी (ता.औसा) येथील औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा प्रयोगशील शेतकरी योगीराज पाटील यांनी जुलै व ऑगस्ट महिन्यात अवघ्या १३ एकरांत एकूण ३० लाख ८० हजाराचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. नियोजबद्ध व पूर्ण व्यवस्थापन, योग्यवेळी पावसाची हजेरी, तंत्रज्ञानाचा वापर त्याचवेळी पिकाला योग्य भाव व कमी उत्पादन खर्च यामुळे कोथिंबीर पिकातून भरघोस उत्पन्न त्यांना मिळाले. गावरान शेण खत वापरलेल्या जमिनीवर जुलै महिन्याच्या मध्यंतरी कोथिंबीर पिकाच्या घरगुती बियाणांची ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली. घरगुती बियाणे उपलब्ध असल्याने त्याचा अधिक फायदा झाला.

दहा दिवसांत पिकाची उगवण झाल्याचे पाहायला मिळाले. २० व्या दिवशी खुरपणी केली ज्यामुळे पिकाची वाढ होण्यास मदत झाली. तसेच करपा, घोंगाट, पाने पिवळी होणे या रोगापासून पिकांचा बचाव करण्यासाठी एकूण चार फवारणी करण्यात आल्या. त्याचा फायदा रंग व पिकाच्या वाढीसाठी ही झाला. श्री.पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला असून शेतामध्ये नव-नवीन प्रयोग करण्याची त्यांना आवड आहे. नियमित रोज पहाटे पाच वाजता ते आपल्या शेतात जाऊन दिवसभराच्या कामाचे नियोजन करतात. राजकीय जीवनातून वेळ काढून अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने नियोजनपूर्ण शेती करण्याचे उत्तम कला त्यांनी जोपासली आहे. हेच त्यांच्या शेतीतील यशाचे रहस्य आहे.

आनंदाची वार्ता : उमरग्यात दोन महिन्यांत ६१ जेष्ठ नागरिकांनी केली कोरोनावर मात

कोथिंबीर हे पीक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे दिसून आले आहे. हे पिक शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय असून त्यामुळे मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे. खासगी वाहनांदेखील वाहतूक करण्यासाठी कोथिंबीर हे पीक फायदेशीर ठरत आहे. एरवी शेतकऱ्यांना आपला शेतीमाल घेऊन स्वखर्चाने बाजारपेठेत जावे लागते. मात्र या पिकासाठी स्वतः व्यापारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मालाची खरेदी करतो. अगदी सव्वा महिन्यात येणारे पीक शेतकऱ्यांना नगदी पैसे देऊन जाते. कोथिंबिरीने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नवसंजीवनी आणण्याचे काम केले असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोथिंबिरीला योग्य भाव मिळत असून यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भावाची खात्री करूनच मालाची विक्री करावी, असे आवाहन देखील श्री. पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांना केले.

 

शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा परिपूर्ण अभ्यास करून शेतीमध्ये आवश्यक बदल करण्याची गरज आहे. अलीकडे अनेक शेतकऱ्यांचा पारंपरिक पिकांना बगल देत कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड करण्याकडे कल आहे.
- योगीराज पाटील, प्रयोगशील शेतकरी, उजनी

उजनी परिसरातील शेतकऱ्यांना कोथिंबीर पिकातून चांगले उत्पन्न मिळत आहे. या पिकामध्ये उष्णता असल्यामुळे त्याचा इतर पिकावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ते एकाच जमिनीवर न घेता क्षेत्र बदलून घेतल्यास फायदा होईल.
- बालाजी घोडके, कृषी सहायक

 

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kothimbiri Utpadak Farmers Become Lakhpati Ujani Latur News