पपईने बनविले लखपती 

प्रभाकर बारसे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

परतीच्या पावसाने इतर पिकांचे नुकसान झाले असताना त्यांना पपई पिकाने दिलासा दिला आहे. याेग्य नियोजन, जिद्द व मेहनतीच्या जाेरावर हे शक्य झाल्याचे श्री. साखरे यांनी सांगितले.

गिरगाव (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील गिरगाव येथील नामदेव साखरे या शेतकऱ्याने शेततळ्यातील पाण्यावर दोन एकरात वर्षभरात दीड लाखाचे उत्पन्न घेतले आहे. परतीच्या पावसाने इतर पिकांचे नुकसान झाले असताना त्यांना पपई पिकाने दिलासा दिला आहे. याेग्य नियोजन, जिद्द व मेहनतीच्या जाेरावर हे शक्य झाल्याचे श्री. साखरे यांनी सांगितले.

येथील शेतकरी नामदेव साखरे यांच्याकडे आठ एकर शेती आहे. शेतात विहीर, बोअरवेल व शेततळे घेतले आहे. परंतु, विहीर व बोअरवेलचे पाणी उन्हाळ्यात कमी पडते. त्यामुळे विहीर व बोअरवेलचे पाणी शेततळ्यात साठवून ठेवतात. मात्र, पारंपारिक पिकातून अपेक्षित उत्पादन हाती लागत नव्हते. त्यामुळे त्यांनी २०१८ मध्ये दोन एकरात पपई लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी पपईची दीड हजार रोपे लावली. त्‍याचे योग्य नियोजन केले. शेततळ्यात साठवून ठेवलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करत खताची मात्रा देवून झाडे जगविली. आता पपईची तोडणी सुरू असून रोपे ते विक्रीपर्यंत वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आला. मालेगाव (जि. नांदेड) येथील एका व्यापाऱ्याने दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये प्रति क्‍विंटल प्रमाणे पपईची खरेदी केली आहे. यातून त्‍यांना दोन एकरात खर्चवजा जाता दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला. परतीच्या पावसाने पारंपारिक पिके हातची गेली आहेत. या पिकांतून लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे मोठे आर्थिक संकट उभे टाकले होते. मात्र, पपई पिकाने दिलासा दिला आहे. योग्य नियोजन, काटकसर, जिद्द व कठोर मेहनतीमुळे हे शक्‍य झाले असून यासाठी कुटुंबीयांची मोठी मदत झाल्याचे श्री. साखरे यांनी सांगितले. 

 

पारंपारिक पिकांबरोबर पपईची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्‍यासाठी योग्य नियोजन केले. शेतात असलेल्या विहीर व बोअरवेलचे पाणी शेततळ्यात जमा करून पपईला दिले. लागवड ते काढणीपर्यंत वीस हजारांचा खर्च आला. आता खर्च वजा जाता दीड लाख रुपयाचे उत्‍पन्न हाती आले. योग्य नियोजन, जिद्द व कठोर मेहनतीमुळे हे शक्‍य झाले आहे.
- नामदेव साखरे, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakpati made by papaya