फुजी, एन्ड्युरन्सला ऑरिकमध्ये जमीन

आदित्य वाघमारे
रविवार, 1 सप्टेंबर 2019

सव्वीस एकर जागेचे वितरण, कारखाना उभारणीला लवकरच सुरवात 

औरंगाबाद - प्रीकास्ट डक्‍ट उद्योगात अग्रेसर असलेली जपानी कंपनी फुजी सिल्व्हरटेक  या उद्योगाला ऑरिकमध्ये 16 एकर जागेचे वितरण करण्यात आले आहे. तर ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी सुटे भाग तयार करणाऱ्या एन्ड्युरन्सलाही दहा एकर जागेचे वितरण करण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्या कारखाना उभारणीच्या कामाला लवकरच सुरवात करणार असल्याची माहिती ऑरिकतर्फे देण्यात आली. 

अनेक दिवसांपासून ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीत फुजी सिल्व्हरटेक  या जपानी उद्योग स्थापनेच्या प्रस्तावाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. 125 कोटींच्या गुंतवणुकीसाठी पुढाकार घेणाऱ्या फुजी सिल्व्हरटेक ही कंपनी प्रीकास्टमधून स्टॉर्म वॉटर, पूल, भिंती तयार करते. या कंपनीने ऑरिकमध्ये जमिनीसाठी अर्ज केला होता. त्यांना गुरुवारी (ता.31) सायंकाळी 15 एकर जमीन देण्यात आली. त्यासाठीचे पत्र कंपनीला देण्यात आले असल्याची माहिती औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिपचे सहसरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी "सकाळ'ला दिली. दरम्यान, टायरजगतात येऊ इच्छिणाऱ्या मात्र नंतर आपला निर्णय बदलणाऱ्या एन्ड्युरन्सच्या गुंतवणुकीवर असलेले शंकेचे ढगही दूर झाले आहेत. या कंपनीच्या गुंतवणुकीचा आकडा कळाला नसला तरी एन्ड्युरन्सने ऑरिकमध्ये 10 एकर जमीन घेतली असल्याची माहिती श्री. पाटील यांनी पुढे दिली. 

एनजीटीच्या नियमांचे ऑरिककडून पालन 
 औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ऑरिकला पर्यावरण मंत्रालयाचा क्‍लिअरन्स मिळाला आहे. त्यांनी घालून दिलेल्या नियम आणि बंधनांचे पालन करण्यात ऑरिक कटिबद्ध आहे, यापुढेही राहणारच आहे. आमच्या प्रकल्पात प्रदूषणाची मोजदाद करणारे सेन्सर्स आहेत. ते किमान आणि मर्यादेत राहण्यासाठी आम्ही काळजी घेतो. त्यामुळे "ऑरिक'मध्ये येणाऱ्या उद्योगांना याची कोणतीही आडकाठी येणार नाही, अशी माहिती गजानन पाटील यांनी दिली. 
----- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Land in Auric city Aurangabad to Fuji SilverTech