
लातूर : जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात वाढते तापमान, पाण्याचा होत असलेल्या अधिकचा उपसा याचा परिणाम होवून जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या १४२ प्रकल्पातील २० टक्के पाणीसाठा संपला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने सर्वच प्रकल्प शंभर टक्के भरले होते. पण या उन्हाळ्यात मात्र पाण्याचा उपसा अधिक झालेला आहे. या सर्व प्रकल्पात सध्या २७०.३२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून याची टक्केवारी ३८.८७ इतकी आहे.
२७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जिल्ह्याच्या दृष्टीने म्हत्वाच्या असलेल्या १४२ प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठवण क्षमता ६९५.५३ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या या सर्व प्रकल्पात मिळून २७०.२३ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. याची टक्केवारी ३८.८७ इतकी आहे. आठ दिवसात चार टक्के पाणी कमी मार्च अखेरपासून ते बारा मेपर्यंतची पाणी साठ्याची आकडेवारी पाहिली तर दर आठ दिवसाला सरासरी तीन ते चार टक्के पाणी कमी होत चालले आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही वाढत आहे. तसेच उन्हाळी पिके व ऊसासाठी देखील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तर दुसरीकडे सिंचनासाठी देखील काही प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेले आहे.
`मांजरा`त ४९ टक्के पाणीसाठा लातूरच्या दृष्टीने मांजरा धरण महत्वाचे आहे. यात सध्या ८७.९७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. याची टक्केवारी ४९.७१ इतकी आहे. निम्न तेरणा प्रकल्पात ५७.२० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून याची टक्केवारी ६२.७१ इतकी आहे.
आकडे बोलतात...
लातूर जिल्ह्यातील १४२ प्रकल्पातील गेल्या दीड महिन्यातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.
तारीख टक्केवारी
३१ मार्च ५८.४४ टक्के
७ एप्रिल ५५.१५ टक्के
१४ एप्रिल ५२.०४ टक्के
२१ एप्रिल ४९.०४ टक्के
२८ एप्रिल ४६.६० टक्के
५ मे ४२.०५ टक्के
१२ मे ३८.८७