
मोतोश्री लंच होम समोर नांदेडहून- लातूरकडे निघालेल्या फोर्ड कंपनीच्या कारची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात मोपेडवरील गोविंद भदाडे हे जागीच ठार झाले
वडवळ नागनाथ, (जि.लातूर): मोपेड आणि कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषन अपघातात मोपेडस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (ता.आठ) सकाळी लातूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपाटीजवळ (ता.चाकूर) घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: लातूररोड (ता.चाकूर) येथील गोविंद निवृत्तीराव भदाडे (वय ३७) हे पुणे येथील एका खासगी कंपनीत कामाला होते. काही कामानिमित्त ते आपल्या आईला भेटण्यासाठी रविवारी (ता.सात) रात्री ते पुण्याहून मोपेडवरून (एम.एच.१४.जे.के.१२४७) आपल्या गावाकडे येत असताना सोमवारी (ता.आठ) सकाळी लातूर- नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपाटीजवळ असलेल्या मोतोश्री लंच होम समोर नांदेडहून- लातूरकडे निघालेल्या फोर्ड कंपनीच्या कारची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात मोपेडवरील गोविंद भदाडे हे जागीच ठार झाले.
धक्कादायक! बलात्कारामुळे पत्नीने आत्महत्या केली आणि सहाव्या दिवशी पतीनेही घेतला...
दरम्यान, अपघातची माहिती मिळताच घरणी येथील राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिदास उळागड्डे, जमादार दत्तात्रय गिरी, नितीन चव्हाण, राहुल गव्हाणे यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ वाहतूक सुरळीत केली. यावेळी चाकूरचे पोलिस निरीक्षक सोपानराव सिरसाट, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कामत, पोलिस जमादार भागवत मामडगे, चालक सुशिल दिवटे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मयत भदाडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे. भदाडे यांच्या पश्चात आई मैनाबाई भदाडे ( सदस्या- ग्रामपंचायत लातूर रोड), भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. गोविंदच्या अपघाती निधनाची बातमी येताच लातूररोड गावावर शोककळा पसरली आहे