लातूर : बनावट देशी दारूच्या कारखान्यावर कारवाई; लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसणीत अॅग्रो इंडस्ट्रीजच्या नावाखाली सुरू होता गोरखधंदा
Action against fake local liquor factory
Action against fake local liquor factory

लातूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी भुसणी (ता. औसा) शिवारात धडाकेबाज कारवाई करत एक बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्याचा पर्दाफाश केला. कृष्णार्जून अॅग्रो इंडस्ट्रिज अँड वेअर हाऊसच्या नावाखाली बनावट देशी दारूनिर्मितीचा गोरखधंदा सुरू होता. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी दोघांना अटक करून तीन वाहनांसह 51 लाखाची यंत्रसामग्री व साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार फरार झाले अटक दोघांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

विभागाचे निरीक्षक आर. एम. बांगर यांनी सांगितले, की भुसणी शिवारात बनावट देशी दारू निर्मिती सुरू असल्याचा संशय होता. त्यावरून मंगळवारी गोदामावर छापा टाकला. ओसाड भागात असलेल्या गोदामावरील छाप्यात कारखानाच आढळला. यात बनावट देशी दारू निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासह आधुनिक यंत्रसामग्री व साहित्य आढळून आले. भुसणी शिवारात हासेगाव रोडवरील कृष्णार्जुन अॅग्रो इंडस्ट्रिज अँड वेअर हाऊसच्या गोदामात हा कारखाना सुरू होता.

पथकाने या छाप्यात बेकायदा व विनापरवाना बनावट देशी मद्याचे निर्मिती व त्यासाठी लागणारे स्पिरीटची (मद्यसार) वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेला ऐवज जप्त केला. यात सात हजार आठशे लिटर स्पिरीट असलेले दोनशे लिटर क्षमतेचे ३९ प्लास्टीक बॅरल, फेलवर (इसेंस), २० बॉक्स टोपण (बुचे), एकबॉटलींग (सिलींग व पॅकींग) मशीन, पाणी फिल्टर मशीन, ब्लेंड मिक्सींग मशीन, विविध बँडचे लेबल, अल्कोहोल मीटर, दहा मॅजरींग ट्युब, १८० मिलीलीटर काचेच्या 11 बाटल्या, नव्वद मिलिलीटर प्लास्टिकच्या बारा बाटल्या, पाणी मोटरचे रिकामे कार्टून बॉक्स, दोनशे लीटर क्षमतेच्या पंधरा सिंटेक्स टाक्या, पाचशे लिटर क्षमतेच्या 16 सिंटेक्स टाक्या, पॅकींग स्लीप, दोन मोबाईल, एक कार, एक कंटेनर व एक ट्रक असा ५१ लाख ६३ हजार ५५० रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

कारवाईत पथकाने रविकुमार शिवपुजन गुप्ता (वय २७, रा. कानपुर तालुका, उत्तरप्रदेश) व ज्ञानेश्वर बाबुसिंग राजपूत (वय ४५ रा. दहिंदुले, ता. पातोंडा, जि. नंदुरबार) या वाहनचालकांना अटक केली आहे. मुख्य आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याचे श्री. बांगर यांनी सांगितले.

कारवाईसाठी दोन जिल्ह्यांचे योगदान

या कारवाईसाठी लातूर व उस्मानाबाद येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले. प्रभारी अधीक्षक अभिजित देशमुख यांनी कारवाईचे नेतृत्व केले. पथकात भरारी पथक निरीक्षक टी. एस. कदम, दुय्यम निरीक्षक पी. जी. कदम, सचिन शेटे, आर. ए. घोरपडे, जवान महेश कंकाळ, विशाल चव्हाण, राजेश गिरी, एजाज शेख, लातूरचे निरीक्षक आर. एम. बांगर, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, अनिरुद्ध देशपांडे, हनुमंत मुंडे, संतोष केंद्रे व सुरेश काळे यांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com