लातूर : पिकांची पाने अन् उती विश्लेषण प्रयोगशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur agriculture Analysis Laboratory fund

लातूर : पिकांची पाने अन् उती विश्लेषण प्रयोगशाळा

लातूर : पिके आणि फळपिकांतील अन्नद्रव्यांची तपासणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच उती व पर्ण परीक्षण अर्थात पिकांचे पान व पेशी विश्लेषण प्रयोगशाळा सुरू होणार आहे. अंबाजोगाई रोडवरील कृषी विभागाच्या माती परीक्षण प्रयोगशाळेतच सुरू होणाऱ्या या कार्यशाळेसाठी जिल्हा नियोजन समितीने ६६ लाख ९२ हजारांचा निधी मंजूर केला आहे. यंत्रसामग्रीची खरेदी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणानंतर दोन महिन्यात कार्यशाळेचे कामकाज सुरू होईल, अशी माहिती जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी श्वेता गिरी यांनी दिली.

रासायनिक खतांचा समतोल वापर करून पिकांचे व फळपिकांचे उत्पादन वाढण्यासाठी ही प्रयोगशाळा आवश्यक आहे. यात पिकांतील पाने, देठ, ऊती (पेशी) आदींचे नमुने घेऊन त्यातील अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेचे प्रमाण काढले जाते. कमी असलेल्या अन्नद्रव्यांची पुर्तता करण्यासाठी खताची मात्रा देण्याची शिफारस केली जाते.पिकांपेक्षा फळपिकांसाठी ही प्रयोगशाळा गरजेची आहे. सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी प्रयोगशाळा सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

त्यानुसार मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, जालना व परभणी येथे प्रयोगशाळा सुरू झाल्या. लातूर व उस्मानाबाद येथील प्रयोगशाळांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. प्रयोगशाळेत नत्र, स्फुरद, पालाश, लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, गंधक, कॅल्शिअम व मॅग्नेशिअम अशा अकरा अन्नद्रव्याची तपासणी करण्यात येणार आहे. यात एका अन्नद्रव्यांच्या तपासणीसाठी शंभर रूपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचे श्रीमती गिरी यांनी सांगितले. फळपिकांच्या वाढीच्या अवस्थेत या अन्नद्रव्यांची तपासणी करण्याची गरज भासते.

कृषी अधिकारी किंवा तज्ज्ञ तपासणीची शिफारस करतात. त्यानुसार कमी अधिक असलेल्या अन्नद्रव्यांची माहिती मिळून शेतकऱ्यांना उपाययोजना करणे शक्य होते. प्रयोगशाळेमुळे योग्य वेळी उपाययोजना होऊन पिकांच्या तसेच फळांच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.

मानांकनाचा प्रस्ताव मद्रासला

गेल्यावर्षी जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या निधीतून जिल्ह्यातील पठडी चिंच, कास्ती कोथिंबीर व बोरसुरी दाळीला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी प्रस्ताव मद्रास येथील संबंधित संस्थेत दाखल करण्यात आला आहे. समितीने `विकेल ते पिकेल` योजनेसाठीही निधी दिली होता. या निधीतून सातशे शेतकरी गटांना उत्पादित शेतीमालाची थेट विक्री करण्यासाठी एक वजन काटा, दोन क्रेटस्, एक ताडपत्री आदी साहित्य देण्यात आले आहे. यात एका गटासाठी पाच ते सहा हजार रूपये खर्च करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी सांगितले.