Latur : शेत शिवारात वेळा - अमावस्या उत्साहात साजरी

शेतकरी कुटुंबांनी केली काळ्याआईची मनोभावे पूजा
तळीखेड
तळीखेड sakal

उमरगा : शेतातील उत्पन्नाची समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करत शुक्रवारी (ता.२३) काळ्याआईची मनोभावे विधीवत पुजा करून  असंख्य शेतकरी कुटुंबांनी वेळा अमावस्या उत्साहात साजरी केली. दरम्यान यंदा रब्बीच्या पेरण्याला थोडा उशीरा झालेला असला तरी पाण्याच्या उपलब्धेतेमुळे पिकांचा बहार आणखी वाढला आहे. दुपारी साडेबारानंतर शेतकऱ्यांनी नातेवाईक मित्रपरिवारासह वन भोजनाचा आनंद घेतला. 

शेतकरी  कुटुंबासाठी वेळा अमावस्याचा  सण म्हणजे आनंद, उत्साहाची पर्वणीच असते. यंदा परतीच्या पावसा दरम्यान अतिवृष्टीने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडवली होती. परिणामी रब्बीची पेरणी उशीरा सुरू झाली. सध्या कांही शिवारात ओलीताखालील पिके बहरात आलेे असले तरी पिकांवरील किड, अळीचे विघ्न दुर करण्याचा खटापोट शेतकऱ्यांना करावा लागतोय. वेळा अमावस्या  असल्याने शहरात अघोषित संचारबंदी असते. शेत- शिवारात मौजमजा करण्याला जणू संधीच मिळाली. 

अमावस्याच्या पुजेसाठी व विविध खाद्यपदार्थाच्या तयारीसाठी शेतकरी कुटुंबात गुरुवारपासुनच (ता.२२) तयारी सुरू होती. शुक्रवारी सकाळपासुन ज्वारीचे पीठ, दह्यापासुन तयार केलेल्या अंबिलाचे मडके घेऊन शेतकरी शेत शिवारात जात असल्याने चित्र दिसत होते. आता दळणवळणाची साधने वाढल्याने बऱ्याच शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मडक्याचा प्रवास वहानातुन सुरू असल्याचे  चित्र दिसून आले.

बैलांना सजवुन बैलगाडीतुन सहकुटुंब शेताकडे जाण्याची मजा औरच असते. अजुनही बरेच शेतकरी कुटुंब बैलगाडीतुन वेळ अमावस्येला जाण्याची प्रथा कायम ठेवली आहे. दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टरमधुनही शेताकडे शेतकरी कुटुंब जात असल्याचे चित्र दिसून आले. दुपारी बारानंतर शेतकरी कुटुंबांनी पाच पांडवाची विधीवत पुजा केली, त्यानंतर शेतातील ज्वारी, हरभरा पिकावर अंबिल शिंपडण्यात आले. ज्वारी, हरभरा, गहू, करडई पिकाच्या हिरवाईत बच्चे कंपनी मनसोक्त खेळाचा आनंद घेतला. वनभोजनानंतर कडवट- अंबट बोरं, हिरव्या चिंचा आणि मधमाश्यांनी संकलित केलेल्या मकरंदाचा आस्वाद चिमूूकल्यांनी घेतला.

वन भोजनाचा घेतला स्वाद

बाजरीपासुन बनविलेले उंडे, बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या, वटाणा, हरभऱ्याचे हिरवे दाणे, बेसन यापासुन बनविलेली भाजी (भज्जी), वांगे, कांद्याची पात व हिरव्या मिरच्यापासुन तयार केलेले भरीत, गव्हाची खीर, कोंदीच्या गोड पोळ्या, आंबट भात (खिचडा) या विविध शक्तीवर्धक पदार्थासह अंबिलाचा घोट घेत दुपारी साडेबारानंतर शेत शिवारात वनभोजनाचा शेतकरी कुटुंब व मित्रपरिवारांनी मनसोक्त स्वाद घेतला. 

सिमावर्तीय भागातही वेळा अमावस्या साजरी

उमरगा तालुका कर्नाटक राज्याच्या सिमेलगत असल्याने बहुतांश सण- उत्सव जवळपास एकसारखे असतात. महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत असलेल्या कर्नाटकातील बहुतांश गावात वेळा अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिमावर्ती भागातील खजुरी, तळीखेड ,धमुरी, उजळंब, एकंबा, आणूर, होदलूर, आळंगा, लाडवंती, नंदगुर, रूद्रवाडी, जामगा, हत्तरगा, हिप्परगा आदी भागात वेळ अमावस्या साजरी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com