
Latur crime news : व्याजाच्या पैशांवरून एकाचा खून ; दोघांना अटक
लातूर : व्याजाने घेतलेल्या पैशांच्या वादातून दोन महिलांसह पाच जणांना मारहाण करून त्यांना जखमी केल्याची घटना शुक्रवारी (ता. २) रेणापूर शहरातील राजेनगर भागात घडली. यातील गंभीर जखमीचा उपचारादरम्यान शनिवारी (ता. ३) मृत्यू झाला. गिरीधारी केशव तपघाले (वय ५०) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी रेणापूर पोलिसांत अॕट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
कमल गिरिधारी तपघाले या पती व तीन मुलांसह रेणापूरच्या राजेनगर येथे राहतात. रोजगार करून हे कुटुंब उपजीविका भागवतात. गेल्या शुक्रवारी लक्ष्मण मार्कड व त्याचा भाचा प्रशांत वाघमोडे (दोघे रा. राजेनगर, रेणापूर) हे कमल तपघाले यांच्या घरी आले. लक्ष्मण मार्कड याने मागील पैशांचे कारण पुढे करीत ''तू तातडीने माझे पैसे दे’ असे म्हणत लोखंडी रॉडने गिरिधारी तपघाले यांना मारहाण केली.
भाचा प्रशांत यानेही गिरिधारी यांना मारहाण केली. सासू कुलबाई केशव तपधाले या भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता लक्ष्मणने त्यांनाही मारहाण केली. ‘माझ्या नवऱ्यास का मारहाण करीत आहात’ म्हणताच कमल यांनाही मारहाण केली. शिवीगाळ करीत, दोघांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तपघाले यांची मुले सचिन, ऋतिक, योगेश व पुतण्या रवी यांनाही लक्ष्मणने बाजारपेठेत शिवीगाळ करून मारहाण केली. त्यात सर्वजण जखमी झाले. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कमल तपघाले यांनी फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक दीपक शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनेतील संशयित आरोपी लक्ष्मण मार्कड व त्याचा भाचा प्रशांत वाघमोडे याच्याविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, गिरिधर केशव तपधाले याचा उपाचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे दोघांविरुद्ध कलम ३०२ अन्वये वाढ करण्यात आली. पोलिस निरीक्षक दिपक शिंदे, पोलिस कर्मचारी अभिजित थोरात, परमेश्वर अंकुलगे तपास करीत आहेत.