लातुरात गॅस सिलिंडरचा स्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur gas cylinder blast

लातुरात गॅस सिलिंडरचा स्फोट

लातूर : येथील राजीव गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर बसून कपडे विकणाऱ्या एका दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात आठ ते दहा दुकाने जळून खाक झाली असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास घडली.

येथील राजीव गांधी चौकात शासकीय विश्रामगृहाच्या समोर रस्त्यावर शेडमारुन काही कपड्याचे दुकाने थाटण्यात आली आहेत. यात बहुतांश दुकाने हे कपड्यांची आहेत. बेडशिट, पिलो, रजई, टेडिबेअर असे हे विविध दुकाने आहेत. या शेडच्या परिसरातच दुकान मालकही राहतात. सायंकाळची वेळ असल्याने एका ठिकाणी स्वंयपाक केला जात असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात एका दुकानाला आग लागली.

ती पसरत पसरत इतर दुकानात गेल्याने आठ ते दहा दुकाने जळाल्याचा अंदाज आहे. या आग व धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने या भागातील एखाद्या पेट्रोल पंपालाच आग लागल्याची चर्चाही शहरात रंगली. पण ही दुकाने कापडाची होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी आल्या. त्यांनी ही आग आटोक्यात आणली. त्यात पाऊसही सुरु झाल्याने त्याचीही आग आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली. ही आग पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.

पोलिस, माजी नगरसेवकाची सतर्कता

ही घटना घडली त्यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अवेझ काझी याच भागात होते. त्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी तसेच त्यांच्यासोबत असलेले पोलिस व नागरीकांच्या सहकाऱ्यांनी तातडीने काही दुकानातील माल बाहेर फेकून तो वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच माजी नगरसेवक पुनित पाटील हे देखील याच भागात होते. त्यांनी तातडीने आयुक्त अमन मित्तल यांना याची माहिती देवून अग्नीशमन दलाच्या गाड्या पाठवण्याची विनंती केली. आयुक्त मित्तल यांनी देखील तातडीने गाड्या पाठवल्याने ही आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.

Web Title: Latur Gas Cylinder Blast Burn Clothing Store

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..