लातूर : ग्रामपंचायतींच्या नावावर १७ एकरचा ‘ओपन स्पेस’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tree plantation

लातूर : ग्रामपंचायतींच्या नावावर १७ एकरचा ‘ओपन स्पेस’

लातूर : शहरातील ओपन स्पेस अर्थात ग्रीन बेल्ट व रस्त्यांची जागा महानगरपालिकेच्या नावावर केल्यानंतर तहसील कार्यालयाने ग्रामीण भागातील या जागा संबंधित ग्रामपंचायतींच्या नावाने केल्या आहेत. तहसीलदार स्वप्निल पवार यांच्या संकल्पनेतील या उपक्रमात आतापर्यंत १७ एकर क्षेत्राचा सातबारा ग्रामपंचायतींच्या नावावर झाला आहे.

उपक्रमाला जिल्हा परिषदेने वृक्ष लागवडीची जोड देत काही ग्रीनबेल्टवर वृक्ष लागवडही केली आहे. यामुळे जिल्ह्यातील वनक्षेत्रात चांगलीच वाढ होण्याची आशा असून असून वृक्ष लागवडीतून ग्रीन बेल्टचे चांगलेच संरक्षण घडून येणार आहे.

जमिनीचे भुखंड (प्लॉट) पाडून विक्री करण्यासाठी अकृषी परवानगी घेताना संबंधित जमीनमालकाला नियमानुसार उद्यान, रस्ता, शाळा व अन्य नागरी सुविधांसाठी मोकळी जागा (ओपन स्पेस) सोडावी लागते. या मोकळ्या जागेच्या क्षेत्राची मालकी स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. मात्र, संस्थेचे नाव सातबारावर येत नसल्याने मोकळी जागा जमिनमालकाच्या नावावर शिल्लक राहते व काही जमिनीचे मालक या क्षेत्राची विक्री करतात.

यातून शासन व नागरिकांची दुहेरी फसवणुक होते. काही जागेवर अतिक्रमणही केले जाते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. व उपविभागीय अधिकारी सुनिल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार पवार यांनी अकृषी परवानगी आदेशानुसार मोकळ्या जागेचा शोध घेऊन त्या जागा फेरफार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नावावर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यातूनच त्यांच्या पुढाकाराने सात महिन्यापू्र्वी शहराच्या हद्दीतील १७ एकर क्षेत्र महानगरपालिकेच्या नावाने झाले व या क्षेत्राचा सातबारा महानगरपालिकेला देण्यात आला.

त्यानंतर शहराच्या भोवती असलेल्या ग्रामीण भागातील तसेच तालुक्यातील मोठ्या गावांतील अकृषी परवानगी आदेशाने निश्चित मोकळ्या जागांचा शोध घेण्यात आला. या जागा संबंधित ग्रामपंचायतींच्या नावाने करण्यासाठी मोहिम हाती घेतली. आतापर्यंत झालेल्या फेरफारानुसार १७ एकर क्षेत्राचा सातबारा संबंधित ग्रामपंचायतींच्या नावावर झाला आहे. आणखी फेरफार होणार असून या क्षेत्रात आणखी वाढ होईल, असे तहसीलदार पवार यांनी सांगितले.

उपक्रमाला वृक्ष लागवडीची जोड

तहसील कार्यालयाच्या या उपक्रमाला जिल्ह्याचे वनक्षेत्र वाढीसाठी भारावलेल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी वृक्ष लागवडीची जोड दिली आहे. ग्रामपंचायतींच्या नावावर झालेल्या क्षेत्रावर जिल्हा परिषदेने मियावॉकी वृक्ष लागवड हाती घेतली असून आतापर्यंत शामनगर, महाराणा प्रतापनगर, आर्वी, खोपेगाव व वरवंटी येथील तेरा ग्रीनबेल्टवर वृक्ष लागवड केली आहे. यापुढे चार बाजूने वृक्ष लागवड करून ग्रीनबेल्टवरील अतिक्रमणाला आळा घालण्यात आहे. ओपन स्पेसचेक्षेत्र जिल्ह्याचा वनक्षेत्राचा टक्का वाढवण्यास मोठा हातभार लावेल, अशी आशा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डी. बी. गिरी यांनी सांगितले.

लातूर शहराच्या हद्दीतील ओपन स्पेसची जागा महानगरपालिकेच्या नावाने केल्यानंतर ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील अकृषी परवानगी व लेआऊटनुसार निश्चित झालेले ओपन स्पेसही ग्रामपंचायतींच्या नावावर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मंडळ अधिकारी व तलाठ्यांचे यात मोठे योगदान आहे. आतापर्यंत २५२ अकृषी आदेशानुसार १६ एकर ८५ गुंठे क्षेत्राचा सातबारा ग्रामपंचायतींच्या नावाने झाला आहे. यात सहा एकर जागा ग्रीन बेल्टची तर ११ एकर जागा रस्ते व अन्य सुविधांची आहे. उर्वरित क्षेत्राचे फेरफारही लवकरच होणार आहेत.

- स्वप्निल पवार, तहसीलदार, लातूर.

Web Title: Latur Gram Panchayats 17 Acres Open Space Tree Plantation Zilla Parishad Tehsil Office

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..