उमरगा औद्योगिक वसाहतीला पुरक ठरावा लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग! 

अविनाश काळे 
Tuesday, 24 November 2020


उमरगा : रेल्वे विभागाच्या पथकाने दळणवळणाच्या दृष्टीने घेतली माहिती; लातूर गुलबर्गा रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू 

उमरगा (उस्मानाबाद) : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजूरी दिल्याने मंगळवारी (ता. २४) मुंबई व सोलापूर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे पथक सर्वेक्षणासाठी  उमरगा शहरात दाखल झाले होते. अधिकाऱ्यांनी रेल्वे वहातूकीसाठी पूरक बाजारपेठ, तालुक्यातील प्रमुख बाजारपेठा आणि उमरगा-लातूर मार्गावरील बस वहातूकीतून होणारी प्रवाशी संख्या आदी माहिती घेतली. दरम्यान हा मार्ग निलंगा, शिरूर अनंतपाळ, उमरगा मार्गे कर्नाटकातील आळंद ते गुलबर्गा असा असणार आहे.
 

उमरगा तालुक्यातील रेल्वे मार्ग असावा अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. शहर राष्ट्रीय महामार्गावर आहे, शिवाय कर्नाटक राज्याच्या सिमेवर आहे. तालुक्यात मोठे उद्योगधंदे नसल्याने सुशिक्षित बेकारांची संख्या मोठी आहे. जकेकूर - चौरस्ता येथील औद्योगिक वसाहत सुरू होऊन अनेक वर्ष झाली मात्र पुरेशी दळणवळणाची सोय नसल्याने या ठिकाणी मोठे उद्योग, व्यवसाय सुरू होत नाही. दरम्यान साधारणतः पाच वर्षापूर्वी तत्कालिन खासदार सुनिल गायकवाड, प्रा. रविंद्र गायकवाड, माजी आमदार बसवराज पाटील यांच्या प्रयत्नातून लातूर - गुलबर्गा रेल्वे मार्गाला मंजूरी मिळाली होती. हा मार्ग औसा, उमरगा मार्गे असा होता. या मार्गाच्या सर्वेलाही बऱ्याच कालावधीनंतर मंजूरी मिळाली होती परंतू सर्वे होऊ शकला नाही. आता हा मार्ग शिरूर अनंतपाळ, निलंगा, उमरगा ते कर्नाटकातील आळंद असा असणार आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतली माहिती

लातूर-गुलबर्गा हा रेल्वे मार्ग भांतागळी, सुगांव, शिरूर अनंतपाळ, बिंबराळ, मूगाव, हाडगा, मदनसूरी, रामलिंग मुदगड (ता. निलंगा) गुगळगांव, उमरगा, कसगी (ता.उमरगा), बंगारगा, आळंद, कडगंची, सुंटनुर (कर्नाटक) असा असणार आहे. एकुण १६२.४६ किलोमीटरचा हा मार्ग असेल. रेल्वे विभागाच्या अभियंत्यांच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार शिरूर अनंतपाळ,  हाडगा (निलंगा), उमरगा येथे रेल्वे जंक्शन असेल आणि उर्वरीत ठिकाणी छोटे थांबे असतील. मंगळवारी मुंबई रेल्वेचे उपप्रबंधक (वाणिज्य, सर्वे) सुरेंद्र चंद्र जैन, आर. व्ही. गुजराल ट्रॉफीक इस्पेक्टर (मुंबई), मुकेशलाल ट्रॉफीक इस्पेक्टर (मुंबई), व्ही.पी. चौधरी अभियंता (सोलापूर मध्य रेल्वे) यांचे पथक उमरग्यात आले होते, त्यांनी  उमरगा येथून लातूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या बसस्थानकातून घेतली. उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. गेल्या तीन वर्षांतील धान्याची आवक - जावक आणि लातूर आणि कर्नाटकात साधारणतः जाणाऱ्या मालाची माहिती बाजार समितीचे सचिव सिद्धप्पा घोडके यांनी दिली. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी तहसीलदार संजय पवार, नायब तहसीलदार विलास तरंगे यांच्याशी चर्चा करून तालुक्याची माहिती घेतली. दरम्यान यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अॅड. अभयराजे चालुक्य, हर्षवर्धन चालुक्य, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माधव पवार, नगरसेवक अरुण ईगवे, इराप्पा घोडके यांनी रेल्वे मार्गाच्या कनेक्टीव्हीटीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. निलंगा तालुक्यातील कासारशिर्सी, उमरगा तालुक्यातील मुळज, त्रिकोळी शिवारातून रेल्वे मार्ग सरळ होऊ शकतो अशी चर्चा केली.

औद्योगिक वसाहतीला पूरक असावा रेल्वे मार्ग

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी निलंगा मार्गे उमरगा तालुक्यातून लातूर - गुलबर्गा रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला. या मार्गाचे सर्वेक्षण प्राथमिक टप्प्यात आहे. तालुक्यातील गुगळगांव व कसगी या दोन गावाचा उल्लेख मार्ग कनेक्टीव्हीटीमध्ये दिसतो आहे. या मार्गाला अंतिम स्वरुप देण्यासाठी बराच कालावधी लागेल मात्र हा मार्ग उमरग्याच्या जकेकूर-चौरस्त्याच्या औद्योगिक वसाहतीला पुरक असेल तर दळणवळणासाठी सोयीचा ठरेल. त्यादृष्टीने आतापासूनच लोकप्रतिनिधींनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.

" लातूर - गुलबर्गा रेल्वे मार्गाबाबतच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सर्वांसाठी सोयीची मार्ग कनेक्टीव्हीटी, मार्गावरील प्रमुख बाजारपेठा, तेथील उलाढाल, प्रवाशी संख्येचा अंदाज आदी महत्वाच्या टिप्पण्या घेण्यात येत आहेत. साधारणतः तीन महिन्यात अहवाल तयार होईल, त्यानंतर रेल्वेमंत्रालयाकडे अहवाल पाठवण्यात येईल. - सुरेंद्र चंद्र जैन, उपप्रबंधक (रेल्वे वाणिज्य, सर्वे विभाग, मुंबई)

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur-Gulbarga railway line complement Umarga industrial estate