लातूर-कुर्डुवाडी मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Kurduwadi railways Electrification work complete

लातूर-कुर्डुवाडी मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

उस्मानाबाद : लातूर-उस्मानाबाद ते कुर्डुवाडी रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या महिन्यात येथून विजेवरील रेल्वे धावेल, असा विश्‍वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. हा सुमारे १८६ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग आहे.

लातूरसह उस्मानाबादचा बराचसा भाग निजामाच्या राजवटीखाली होता. इंग्रजांनी येथे रेल्वेसेवा सुरू केली होती. त्यानंतर २०१० च्या दशकात इथे ब्रॉडगेज रेल्वेसेवा सूरू झाली. त्यामुळे रेल्वेच्या नकाशावर दोन्ही जिल्हे आले. ब्रॉडगेज सेवा सुरू झाल्यानंतर कोल्हापूर ते नागपूर अशी रेल्वेसेवा सुरू झाली. दक्षिण महाराष्ट्र ते पूर्व महाराष्ट्राच्या दरम्यानची दोन महानगरे या सेवेने जोडली गेली.

यामध्ये गतीमानता येण्यासाठी लातूर ते कुर्डुवाडी दरम्यानच्या मार्गाचे विद्युतीकरण व्हावे, अशी मागणी होती. या मागणीला आता यश येत आहे. पोल उभारणी, तारा (ओव्हरहेड) जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक बाबी पूर्ण करून ही सेवा सुरू होण्यास काही अडचण नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रेल्वेसेवा वेगवान होणार

विद्युतीकरण झाल्याने या मार्गावरील वाहतूक अधिक वेगवान होणार आहे. परिणामी या मार्गावरील रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या वाढणार आहे. पुणे, हैदराबाद, नांदेड, अशी मोठी शहरे लातूर तसेच उस्मानाबादला जोडलेली असून येथील प्रवास गतिमान होणार आहे. विद्युतीकरणाचे काम जिल्ह्याच्या विकासात भर टाकणारे ठरणार आहे.

कोट कोट कोट कुर्डुवाडी- लातूर मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या महिन्याभरात ते पूर्ण होईल. लवकरच या मार्गावर विजेवरील रेल्वे इंजिनची चाचणी होणार आहे.

- एल. के. रणयेवले, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर