लातुरात जमिनीची लवकरच 'सॅटेलाईट मोजणी'

अक्षांश आणि रेखांशासह मिळणार नकाशा; मोजणीच्या वेळेत कमालीची बचत
Latur land Satellite survey soon Map
Latur land Satellite survey soon Mapsakal

लातूर : जमिनीची मोजणी केल्यानंतर केलेल्या खुणा काढून टाकणे, वारंवार जमिनीची मोजणी करावी लागणे यासह मोजणीशी निगडित वादाचे प्रकार आता थांबण्याचे नाव घेणार आहेत. यावर भूमिअभिलेख अर्थात मोजणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत रामबाण उपाय शोधला आहे. यातूनच जमिनीची सॅटेलाईट मोजणी होणार असून, त्यासाठी जिल्ह्यात दहा आधुनिक रोव्हर्स मशीन दाखल होत आहेत. नव्या मोजणीसाठी जिल्ह्यात दोन ठिकाणी कॉर्स स्टेशनची उभारणी झाली असून, यामुळे मोजणीच्या वेळेत निम्म्याने बचत होणार आहे. शेतकऱ्यांना आता अक्षांश व रेखांशासह मोजणी नकाशा मिळणार आहे.

विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला असतानाच जमीन मोजणीच्या प्रक्रियेतही त्याचा अंतर्भाव होत आहे. यातूनच सर्वे ऑफ इंडियाने उपग्रहाच्या (सॅटेलाईट) साह्याने मोजणीसाठी देशभरात कॉर्स (कंटिन्युअस ऑफरेशन रेफरन्स स्टेशन) स्टेशन उभारले आहेत. महाराष्ट्रात ७७ ठिकाणी या स्टेशनची उभारणी पूर्ण झाली असून, जिल्ह्यात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व उदगीरच्या आयटीआयमध्ये दोन स्टेशन उभारली आहेत. स्टेशनच्या माध्यमातून मोजणीच्या नवीन रोव्हर्स मशीनला सॅटेलाईटचे नेटवर्क किंवा सिग्नल उपलब्ध होणार आहेत.

मोजणीची प्रणाली जीपीएसवर आधारित असून, त्यावरून जमिनीच्या क्षेत्राचे निश्चित ठिकाण कळणार आहे.जिल्ह्यासाठी दहा रोव्हर्स मशीन खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीने एक कोटी पाच लाख रुपयांचा निधी दिला असून, मशीनची खरेदी प्रक्रियाही सुरू झाली आहे. दहा मेपर्यंत मशीन उपलब्ध होण्याची आशा असून, नवीन मोजणीचे जिल्ह्यातील चाळीस कर्मचाऱ्यांना दोन दिवसाचे प्रशिक्षणही देण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख सुरेखा सेठिया यांनी सांगितले.

मोजणीच्या प्रक्रियेत नवा अध्याय

सुरुवातीच्या काळात शंकूसाखळीच्या व त्यानंतर प्लेनटेबलच्या (फलक यंत्र) साह्याने मोजणी करण्यात येत होती. दोन्ही मोजणीत बिंदू निश्चित करण्यासाठी मोठा वेळ लागत होता. अचूकता येत नव्हती. २००८ पासून ईटीएस मशिनच्या साह्याने होत असलेली मोजणी ही अक्षांश व रेखांशाआधारे नव्हती. यासोबत तीनही प्रकारात मानवी हस्तक्षेपाला संधी होती. मोजणीवर आक्षेप आल्यास ती पुन्हा करावी लागत होती. रोव्हर्समुळे मोजणीत नवा अध्याय सुरू झाला असून, त्यात मानवी हस्तक्षेपाला संधी नाही. अक्षांश व रेखांशाआधारे मोजणी होणार असल्याने एकदा मोजणी झाल्यानंतर त्यावरूनच क्षेत्र निश्चित करता येणार असल्याचेही श्रीमती सेठिया यांनी सांगितले.

वाढती मागणी अन् अचुकतेची गरज

काळानुरूप मोजणीला मोठे महत्त्व आले आहे. स्वतःच्या मालकीची एक इंचदेखील जागा कोणी सोडण्यास तयार नसल्याने मोजणीतील अचूकता आवश्यक बाब ठरली आहे. जमिनीच्या वाटण्या व त्यातून निर्माण होणाऱ्या वादावर तोडगा काढण्यासाठी मोजणी प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विकास कामांसाठीही भूसंपादनाची मोजणी वाढली आहे. यातूनच जलद व अचूक मोजणीची गरज पूर्ण करण्यासाठी जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू यांनी मोजणी प्रक्रियेत रोव्हर्स माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार केल्याचे श्रीमती सेठिया यांनी सांगितले.

जमाबंदी आयुक्त सुधांशू व औरंगाबादचे उपसंचालक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात लवकरच नव्या पद्धतीची मोजणी सुरू होणार आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमातून निधी उपलब्ध करून दिला आहे.

- सुरेखा सेठिया, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख,लातूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com