जांबचा बैलबाजार फुलला...! आसपासच्या 5-6 जिल्ह्यातील लोकांची खरेदी-विक्रीसाठी गर्दी

विवेक पोतदार
Friday, 29 January 2021

येथून जवळच असलेल्या जांब बुद्रुक (ता.मुखेड जि.नांदेड) येथील शुक्रवारच्या आठवडी बाजारातील जनावरांची गर्दी झाली आहे.

जळकोट,(जि.लातूर): येथून जवळच असलेल्या जांब बुद्रुक (ता.मुखेड जि नांदेड)  येथील शुक्रवारचा आठवडी बैलबाजार अलिकडे चांगलाच फुलला आहे. शेतकरी पशुधन विक्रीसाठी बाजारात मोठी गर्दी करत आहेत. तर दुसरीकडे बाजारामुळे अनेकांना रोजगार मिळत असल्याचे चित्र आहे.

या बैलबाजारात नांदेड, लातूर, परभणी, उस्मानाबाद आदि जिल्ह्यांतून पशुपालक व व्यापारी हजेरी लावतात. अल्पकाळातच हा बाजार नावारूपाला आला असून टाळेबंदी काही काळ बंद असलेला हा बाजार आता चांगलाच फुलला असल्याचे चित्र आहे.

जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, 20 जणांवर गुन्हा दाखल; 7 लाख रुपयांचे साहित्य...

तालुक्यातील विविध पिकांना खरीप उत्पादनात बसलेला फटक्यामुळे जनावरे विक्री करावे लागत आहेत. ४७ गावांसह वाडी-तांडे असलेल्या या तालुक्यात सर्वसाधारण,हलक्या प्रतीची सर्वाधिक जमिन असून पाण्याचे दुर्भिक्ष आहे. यात शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात. एकीकडे शेतीकामाला औताला बैल लागतात. तर दुसरीकडे गाय-म्हशी दुधासाठी ठेवतात. यात दुग्धव्यवसायाचाही हेतु असतो. त्यात कालवडी,गोर्हे, वगारी यांची खरेदी विक्रीतून आर्थिक हातभार मिळतो. म्हणून अनेक शेतकरी जनावरे ठेवतात.

अलिकडे आधुनिक काळात ते न परवडणारे ठरत आहे. कारण एकीकडे चारा-पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे मजुरी मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याचा अनुभव येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे पशुधनाला मोठ्या प्रमाणात बाजारचा रस्ता दाखवावा लागत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे रब्बीची हमी नसलेला व क्षेत्र नसलेला हा तालुका असल्यामुळे सर्व भिस्त खरिपावरच आहे.

गेल्या काही दिवसापासून दावणीची जनावरे कमी करण्याची वेळ शेतकर्यावर आली आहे. अनेक शेतकरी चार्याची जमवाजमव करत आहेत. तर काही शेतकरी नाविलाजाने भाकड जनावरांना बाजारचा रस्ता दाखवला जात आहे. जांब बुद्रुक (ता.मुखेड जि.नांदेड ) येथील बैलबाजारात जनावरांच्या विक्रीसाठी शेतकरी जात आहेत. येणारे सात-आठ महिने कसे काढायचे,जनावरांना कसे जगवायचे हा खरा प्रश्न आहे.

हिंगोलीत कर सल्लागार असोसिएशनचे जीएसटीच्या जाचक अटी रद्द करण्यासाठी आंदोलन

१. शेती तोट्यात
हलक्या प्रतीची जमिनी व सतत पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे शेती तोट्यात येत आहे आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.वन्यपशुंचाही त्रास शेतकर्यांना होत आहे.

२.बाजारामुळे रोजगार
या बाजारामुळे अनेकांना रोजगार मिळत आहे. यात छोटे व्यावसायिक ज्यात चहा-पाणी, फराळासाठी हाॅटेल, कंठे,दोर्या,घंट्या,कासरे,म्होरक्या, विकणारे,  तसेच जनावरांचे वाढलेली शिंगे काढणारे, म्हशींचे केस कातरणारे, जनावरांना चारा पेंडी विकणारे आदिंचे व्यवसाय चालतात. ते आठवडी बाजारची वाट पाहतात.

३. म्हशींची विक्री
या बाजारात राज्यमार्गाच्या दक्षिण दिशेला म्हशींचा बाजार भरतो. म्हशींची चांगली खरेदी विक्री होताना दिसते. विशेषतः दुधाळ जनावरांना मागणी असल्याचे चित्र आहे.तर उत्तरेला बैलबाजार भरतो.

४. भाकड जनावरे
बाजारात भाकड जनावरे मात्र कवडीमोल भावात विकावी लागतात. जनावरे कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांना बाजारचा रस्ता दाखवतात.

97 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; घनसावंगी तालुक्यातील चित्र, दुसर्...

५. चांगली बैलजोडी किंमत लाखांच्यावर
चांगली औताची बैलजोडीची किंमत एक लाखाचे वर आहे.यात लालकंधारी जनावरांना मागणी जास्त असते. तसेच गोर्ह्यांना मागणी असल्याचे दिसते.

६. एक रूपया देवून सौदा
बाजारात एक वैशिष्ट्ये असते ते म्हणजे व्यापारी पशुपालकाच्या हातात अगोदर एक रूपया देतात व बोलिला सुरवात करतात. जनावराचा सौदा पटला तर रूपया तुमच्याकडे नाहीतर परत दिला जातो. मग ते जनावर पाच हजाराचे असो की,लाख रूपयांचे.

वाहनांनाही मिळते भाडे
अनेक बेरोजगारांनी घेतलेली छोटी वाहने ज्यात टेंपोरल,मोठे अॅटो, टमटम, तसेच मालवाहुतुक करणारी वाहने,  यांच्याबरोबरच ट्रक आदिंना यामुळे रोजगार मिळतो. जवळच्या गावची जनावरे चालत अाणतात परंतु दूरवरून येणारी जनावरे अशा वाहनातून आणतात त्यामुळे वाहनचालकांना रोजगार या माध्यमातून मिळतो.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur latest news Jambs bull market flourished Crowds people from surrounding 5 districts