औसा-निलंगा मार्गावर गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात; लाखोंचा गुटखा पोलिसांकडून जप्त

latur accident gutkha truck
latur accident gutkha truck

औसा (लातूर): राज्यात गुटखा बंदी असताना जिल्ह्यात परराज्यातून होत असलेल्या गुटक्याच्या तस्करीने प्रमाण सुरुच असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागासह शहरातसुद्धा बंदी असलेला गुटखा सर्रास मिळताना दिसत आहे. या गुटख्याच्या तस्करीतून आपले उखळ पांढरे करून घेणारी साखळी मोठी असल्याने व त्याला मिळणारा राजाश्रय पाहता सरकारची गुटखा बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसते.

सोमवारी (ता.१२) रोजी असाच परराज्यातून दिवसा ढवळ्या गुटखा घेऊन येत असलेला ट्रक औसा- निलंगा रोडवर फत्तेपुर पाटी जवळ उलटला. यात लाखों रुपयांचा गुटखा असल्याने चालक घटनास्थळावरून पोबारा झाला. मग येणाऱ्या जाणाऱ्यांनी गुठख्यावर आपला हात साफ केल्याची घटना घडली. औसा पोलिसांनी घटनास्थळावरून एक टेम्पो आणि छोटा हत्ती वाहन भरून गुटखा जप्त केला असून अद्याप औसा पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लामजना चौकातून औशाकडे येणारा ट्रक (क्रमांक के. ए.३८/६४८३) हा सोमवारी सकाळी फत्तेपुर ते दावतपुर या दरम्यान उलटला. या ट्रकमध्ये लाखों रुपयांचा गुटखा भरलेला होता. ट्रक उलटल्यावर चालक फरार झाला. मग बघ्यांनी गुटख्याच्या अनेक बॅगा लंपास केल्या. या घटनेची माहिती औसा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी लोकांच्या हातातला गुटखा परत घेऊन व अपघातग्रस्त वाहनातील गुटखा ताब्यात घेतला. हा गुटखा एक ४०७ टेम्पो आणि एक छोटा हत्ती वाहनात घालून तो ठाण्यात आणला असून औसा पोलिसांकडून या बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

प्रशासनाचे दुर्लक्ष-

गुटखा तस्करीत जिल्ह्याभरात मोठी उलाढाल होत असून यात अनेक मोठ्या लोकांचे हात यात गुंतले असल्याचे बोलले जात आहे. भर दिवसा ट्रक भरून गुटखा राजरोसपणे आणला जातो आणि कोणी त्याला अडवू शकत नसेल तर नक्कीच याला मोठा राजाश्रय आणि प्रशासनाचा हातभार असल्याचे बोलले जात आहे. करोडो रुपयांच्या धाडीत हजारांवर गुटखा सापडल्याचे दाखविले जात असल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. अन्न व औषधी प्रशासनासह पोलीस यंत्रणाही गुटखा बंद करण्यात अपयशी ठरत असल्याने ही गुटख्याची तस्करी दिवसेंदिवस वाढत असून गुटखाबंदी केवळ कागदावरच आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com