बेशिस्त वाहतुकीने तयार केले मृत्यूचे सापळे!

विजयकुमार बोरफळे
गुरुवार, 6 जुलै 2017

औसा - शहरातील जामा मशीद ते हनुमान मंदिर, खादी कार्यालयाजवळचा भादा रोड-बसस्टॅंड ते ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय व ॲप्रोच रोडवरचा टी-पॉईंट ही मुख्य रस्त्यावरची ठिकाणे वाहतुकीसाठी व पादचाऱ्यांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत. 

औसा - शहरातील जामा मशीद ते हनुमान मंदिर, खादी कार्यालयाजवळचा भादा रोड-बसस्टॅंड ते ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय व ॲप्रोच रोडवरचा टी-पॉईंट ही मुख्य रस्त्यावरची ठिकाणे वाहतुकीसाठी व पादचाऱ्यांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत. 

गेल्या वीस-पंचवीस वर्षांपूर्वी गांधी चौक परिसरात असलेल्या जुन्या मुख्य बाजारपेठेचे महत्त्व अपुऱ्या जागेमुळे कमी झाले. जामा मशीद ते हनुमान मंदिर, बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय व ॲप्रोच रोडवरील टी-पॉईंट परिसराला आता महत्त्व आले. हा परिसर नगरपरिषद, शासकीय कार्यालये व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आखत्यारीत येतो. व्यापार वृद्धीमुळे या परिसराला कमालीचे महत्त्व आले आहे. त्यामुळे या परिसरातील असंख्य मोकळ्या जागा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्या. त्यांनी फळे, भाजीपाला व किरकोळ विक्रेत्यांसाठी आरक्षित असलेल्या जागाही सोडल्या नाहीत. त्यामुळे रहदारीला अडथळे निर्माण झाले आहेत.  एकाच मार्गावर थांबलेली वाहने, फेरीवाले, विक्रेते, पादचारी यांचा गोंधळ व बेशिस्त, भांडणे व अपघात ही नित्याची बाब झाली आहे. याबाबत जामा मशीद ते हनुमान मंदिरापर्यंत रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष आहे. भादा रोड, बसस्थानक, तहसील कार्यालय व ॲप्रोच रोडवरील टी-पॉईंट या परिसराला सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. भादा रोडच्या बाजूचे नागरिक चक्क रोडच्या साईडपट्ट्याला चिकटून घराची बांधकामे करून रस्ता काबीज करीत असतानाही हे प्रशासन गप्प कसे? असा प्रश्न इतर नागरिकांना पडला आहे. 

या बेशिस्तीला स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहेत; तसेच शहरात जवळपास १०० च्या आसपास ऑटो रिक्षा चालतात. तेवढ्याच प्रमाणात काळी-पिवळी, टमटम व इतर वाहने ग्रामीण भागातून प्रवासी ने-आण करतात. त्यातील निदान साठ टक्के ऑटोचालकांकडे लायसन्स नाहीत. तीस-पस्तीस टक्के अल्पवयीन मुले चालवितात. हेही वाढत्या अपघातांचे कारण बनले आहे.  बसस्थानक, टी-पॉईंट येथे फक्त २०० मीटरपर्यंत वाहने उभी करू नये, हे बोर्ड लावण्याचे काम झाले आहे; परंतु या बोर्डाच्या बाजूला व परिसरात अवैध वाहतुकीची वाहने, ऑटो रिक्षा, शिवाय एस.टी. बसही थांबतात. अशा वेळी दररोज सायंकाळी पोलिस गाडीही तेथेच थांबते. हे टी-पॉईंटवरचे दररोजचे दृश्‍य औसेकर पहात असल्याने बेशिस्तीच्या वाहतुकीला पोलिसही तेवढेच जबाबदार ठरतात.

ऑटोचालकांची दादागिरी
लांब पल्ल्याच्या एसटी महामंडळाच्या बस या मोडवरूनच धावतात. शिवाय लातूर-तुळजापूर-निलंगा-उमरगा या मार्गावर धावणाऱ्या खासगी मिनी ट्रॅव्हल्स आणि काळी-पिवळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपही या गावात येत नसल्याने मोडवरून ये-जा करतात. ग्राहक शोधण्यात गुंग असलेल्या ऑटोचालकांचे लक्ष अजिबात रस्त्यावर नसते. बेशिस्त ऑटोचालकांना शिस्त लावण्याची गरज आहे.

स्टेट बॅंकेसमोरील जागेत रस्त्यावर वाहने लावून बॅंकेत कामाला जाणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करावी; तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने पार्किंगवर कारवाई करण्यात यावी. लातूरच्या धर्तीवर दररोज एका बाजूने पार्किंगची व्यवस्था नगरपालिकेने केल्यास कोंडी सुटण्यास मदत होईल.
- सचिन हुरदुळे, व्यापारी.

बसस्थानकाच्या प्रवेश व बाहेर पडण्याच्या मार्गावर आडवी-तिडवी वाहने उभी करून ऑटोचालक थांबलेले असतात. त्यामुळे अनेकदा वाद निर्माण होतात. बसचालक व ऑटोचालकांमध्येही वाद झालेले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासन आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त कारवाईने यावर तोडगा काढावा.
- नागनाथ पाटील

Web Title: latur news traffic