Ration Grain: विदर्भातील निकृष्ट धान्य मराठवाड्याच्या माथी!; रेशनवरील तांदळामध्ये अळ्या, ज्वारी सडकी

Latur Ration Grain Quality : लातूर जिल्ह्यातील रेशन दुकानांत अळ्या, जाळ्या असलेला निकृष्ट तांदूळ आणि सडकी हायब्रीड ज्वारी वितरित होत असल्याच्या तक्रारी आहेत. सुमारे १७.७३ लाख लाभार्थ्यांना धान्याचा पुरवठा होत असताना गुणवत्ता तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Infested rice and spoiled jowar supplied through ration shops in Latur district.

Infested rice and spoiled jowar supplied through ration shops in Latur district.

esakal

Updated on: 

लातूर, : गोरगरीब लाभार्थ्यांना मोफत, स्वस्त धान्याचा पुरवठा केला जात असल्याचा दावा शासनाकडून केला जात असताना रेशन दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे धान्य लाभार्थ्यांच्या माथी मारले जात आहे. विदर्भातील गोंदियाचा जाळ्यायुक्त (बुरशीसदृश) तांदूळ आणि यवतमाळची सडकी हायब्रीड ज्वारी रेशन दुकानांमध्ये वितरीत केली जात आहे. तांदळात अळ्या, जाळ्या आढळत असून, ज्वारीचीही तशीत गत आहे. काही ठिकाणी तर ज्वारीचे अक्षरशः पीठ झाले आहे. ऐन दिवाळीच्या काळात व त्यानंतरही लाभार्थ्यांना असे निकृष्ट धान्य दिले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

रेशनवरील धान्याच्या दर्जाची तपासणी भारतीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) केली जाते. मात्र, गुणवत्तेच्या तपासणीत घोळ किंवा दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. रेशन दुकानांना धान्य वितरणस्थळी प्रत्येक जिल्ह्याचा एक कर्मचारी कार्यरत ठेवला जातो. मात्र, वरिष्ठांच्या दबावाखाली कर्मचारी हतबल आहेत. परिणामी, निकृष्ट धान्य लाभार्थ्यांच्या गळी उतरवले जात आहे.

तपासणी यंत्रणाच नाही

शासनाकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या धान्याचा दर्जा, गुणवत्ता वेगवेगळ्या पातळीवर तपासली गेली पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. एकदा ‘एफसीआय’कडून तपासणी झाल्यानंतर पुढे कोणतीही प्रक्रिया होत नाही. जिल्हा पातळीवर तपासणी स्वतंत्र यंत्रणा, प्रयोगशाळाही उपलब्ध नाही. धान्य नमुने तपासणीसाठी पुणे येथे प्रयोगशाळा आहे. मात्र तेथे नमुने पाठवले जात नसल्याचे वास्तव आहे.

गुणवत्तेकडे दुर्लक्ष, प्रमाणाकडे लक्ष

रेशन दुकानांत किती धान्य आले, त्याचे प्रमाण किती, किती वाटप झाले आदी बाबींची प्रामुख्याने तपासणी केली जाते. मात्र, लाभार्थ्यांना दिले जाणारे धान्य खाण्यायोग्य आहे की नाही, याची खातरजमा करण्याची कोणतीही प्रभावी व्यवस्था दिसत नाही.

दोन-तीन महिन्यांपासून अत्यंत निकृष्ट दर्जाचा तांदूळ येत आहे. कचरा, खडे, किडे, तुकडे अशा पद्धतीचा हा तांदूळ कोणीही खाऊ शकणार नाही असा आहे. त्याची गुणवत्ता कोणी तपासते की नाही, हा प्रश्न आहे. काही वर्षांपूर्वी असाच तांदूळ आला होता. त्यावेळी नमो ॲपवर तक्रार केली होती. त्यावर तीन महिन्यांनंतर पथकाने कारवाई केली. आताही तसाच तांदूळ आला आहे. संबंधितांकडे तक्रार केली असेल; बघतो, सांगतो, असे उत्तर मिळत आहे.

— वैभव पाटील, केळगाव, ता. निलंगा

आरोग्याशी खेळ

लातूर जिल्ह्यात सुमारे १७ लाख ७३ हजार लाभार्थी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ घेत आहेत. निकृष्ट धान्य देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. गोदामापासून रेशन दुकानापर्यंतच्या प्रवासात गुणवत्तेची तपासणी करणारी यंत्रणाच नसल्याचा फायदा संबंधीत कंत्राटदार घेताना दिसत आहेत. निकृष्ट धान्याबाबत तक्रार केली तरी त्याचा फारसा उपयोग होत नसल्याची भावना लाभार्थ्यांत आहे. परिणामी, मिळेल तेच बरे, असे म्हणून लाभार्थ्यांना ते घ्यावे लागत आहे. ही स्थिती टाळण्यासाठी धन्याची गुणवत्ता तपासण्याची स्वतंत्र यंत्रणा जिल्हा पातळीवर उभारण्याची गरज व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.