लातूर ते टेंभूर्णी चौपदरीकरणाचे लवकरच उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur to Tembhurni Road Development

लातूर ते टेंभूर्णी चौपदरीकरणाचे लवकरच उद्‍घाटन

लातूर : जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्ग आणि रस्त्यांच्या संबंधांने विविध मागण्यांना घेऊन सोमवारी खासदार सुधाकर शृंगारे यांनी सोमवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीत सर्वांच्या जिव्हाळ्याच्या लातूर ते टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणावर चर्चा झाली. हे काम तातडीने करण्याची मागणी खासदार शृंगारे यांनी केल्यानंतर या कामाचे लवकरच उदघाटन करण्याचे आश्वासन गडकरी यांनी शृंगारे यांना दिले आहे. यासोबत जिल्ह्यातील महामार्गाचे विविध कामेही मार्गी लावण्याची हमी त्यांनी दिली.

लातूर ते टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षापासून रेंगाळले आहे. गेल्यावर्षी गडकरी लातूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी या कामाला मान्यता दिली होती. मात्र, त्यापुढे कामाचे अंदाजपत्रक किंवा भुसंपादन आदी कामांचा आराखडा आदी कामांना गतीच मिळत नाही. पुणे व मुंबईला जाण्यासाठी हा रस्ता किती महत्वाचा आहे, याची जाणीव शृंगारे यांनी भेटीत गडकरी यांना करून दिली. हा रस्ता नादुरूस्त असल्याने लातूरहून सोलापूरमार्गे पुण्याला जाण्यासाठी प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर हे काम तातडीने हाती घेण्यासाठी गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व या कामाचे उदघाटन लवकरच करण्याचे आश्वासन त्यांनी शृंगारे यांना दिले. जिंतूर ते भालकी या राज्यमार्गाला मंजुरी देऊन पाच वर्षे झाली तरी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु झाले नाही. या रस्त्यावरील वडवळ नागनाथ (ता. चाकूर) येथील संजीवनी बेट आणि वटसिद्ध नागनाथ मंदिरांत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. बेटावरील दुर्मिळ औषधांच्या व्यापारांसोबत पर्यटन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

जिंतूर ते परभणी, गंगाखेड, किनगाव, वडवळ नागनाथ, नळेगाव, निटूर, निलंगा, औराद शहाजनी व भालकी असा हा मार्ग आहे. रस्त्याच्या चौपदीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे तसेच संजीवनी बेट आणि वटसिद्ध नागनाथ मंदिर दर्शविणारी कमान घरणी (ता. चाकूर) येथे उभारावी, अशीही मागणी शृंगारे यांनी केली. याला गडकरी यांना होकार भरल्याचे शृंगारे यांनी सांगितले.

घरणी येथे बोगदा करा

घरणी येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बोगदा सोडण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यालाही गडकरी यांनी लागलीच मंजूरी दिली. लातूररोड (ता. चाकूर) येथे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बोगदा सोडण्याची मागणी शृंगारे यांनी केली. या वेळी शृंगारे यांच्यासोबत रणजीत मिरकले, शिवाजी बैनगिरे, अशोक चिंते, संदीप पाटील व संजय कुंभार उपस्थित होते.

Web Title: Latur To Tembhurni Road Quadruple Nitin Gadkari Assurance To Sudhakar Shrangare

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..