लातूरच्या भाजी मार्केटला हवा पोलिस बंदोबस्त, कशामुळे वाचा

हरि तुगावकर
गुरुवार, 26 मार्च 2020

लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. काही खरेदीदारांची दादागिरीमुळे या मार्केटमध्ये गर्दी होत आहे. त्याचा सामनाही बाजार समितीच्या कर्चमाऱ्यांना करावा लागत आहे. या मार्केटमध्ये गर्दी होऊ नये या करीता आता भाजीमार्केटमध्ये पोलिस बंदोबस्त देण्याची गरज आहे.

लातूर  : लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. काही खरेदीदारांची दादागिरीमुळे या मार्केटमध्ये गर्दी होत आहे. त्याचा सामनाही बाजार समितीच्या कर्चमाऱ्यांना करावा लागत आहे. या मार्केटमध्ये गर्दी होऊ नये या करीता आता भाजीमार्केटमध्ये पोलिस बंदोबस्त देण्याची गरज आहे.

कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाय योजना केल्या जात आहेत. त्यात गर्दी होऊ नये म्हणून बंद करण्यात आले आहे. पण भाजीपाला ही जीवनावश्यक वस्तू आहे. त्यामुळे हे मार्केट चालू राहणे गरजेचे आहे. शेतकरी या मार्केटमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. सध्या भाजीपाल्याचे भाव पडलेले आहेत, असे असताना कमी किंमतीत शेतकरी भाजी विक्री करीत आहेत. बाजार समितीच्या वतीने येथे एक सहायक सचिव, एक निरीक्षक, तीन सुरक्षा रक्षक काम करीत आहेत. शेतकऱ्यांना ते व्यवस्थित मार्केटमध्ये सोडतात. पण काही खरेदीदारांची दादागिरी सर्वांना अडचणीत आणणारी ठरत आहे. हे खरेदीदार विनाकारण या मार्केटमध्ये एकाच वेळी गर्दी करीत आहेत. त्यांची ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी या मार्केटमध्ये पोलिस बंदोबस्त देण्याची गरज आहे.

वाचा ः औशाच्या तहसीलदार ग्राहक बनून किराणा दुकानात, चढ्या दराने विक्री

भाजी मार्केटमध्ये भाज्याची आवक चांगली आहे. त्यामुळे एकाच वेळी खरेदीदारानी गर्दी करू नये. गर्दी होत असल्याने अनेक अडचणी येत आहेत. सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालण्याचे प्रकार होत आहेत. या मार्केटला तीन मार्ग आहेत. त्या ठिकाणी एक एक पोलिस ठेवला तर गर्दी आटोक्यात येऊ शकते. त्यामुळे पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.
- ललितभाई शहा, सभापती, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती.

 

कोरोनामुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत
मराठी नववर्षाची सुरवात. उत्साहाचा सण; पण कोरोनाचे संकट प्रत्येकाच्या डोक्यावर घोंघावत आहे. त्यामुळे आज घरोघरी कोरोनामुक्तीचा संकल्प करीत गुढी उभारण्यात आली. हा संकल्प करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. आजच्या उत्साहाला भीतीची झालर मात्र कायम राहिली.
भारतीय संस्कृतीत गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यापारी, शेतकरी, अडते, बांधकाम अशा प्रत्येक क्षेत्रात या दिवसाला महत्त्व दिले जाते. नवनवीन प्रकल्प हाती घेतले जातात. मोठ्या थाटात भूमिपूजन केले जाते. अनेक व्यापारी आजपासून नवीन खातेपानही सुरू करतात; पण आज साजरा होत असलेला गुढीपाडवा जरा वेगळाच राहिला. शहरात घरोघरी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. सर्वच कुटुंबच घरी असल्याने वेगळा आनंद होताच; पण गुढीची पूजा करताना प्रत्येकाच्या मनात कोरोनाची भीती होती. प्रत्येकाच्या उत्साहाला भीतीचे सावट होते.

कोरोनामुक्तीचा संकल्प करीत प्रत्येकाने गुढी उभारत नववर्षाचे स्वागत केले. कोरोनामुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करूया, या वर्षीचा गुढीपाडवा घरात राहून साजरा करूया. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळूया. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आरोग्याची काळजी घेऊया. अशा पद्धतीनेच घरोघरी गुढीची मनोभावे पूजा करण्यात आली. संचारबंदी लागू असल्याने घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला. आरोग्यमय गुढीपाडव्याच्या तसेच नववर्षाच्या शुभेच्छा या संदेशातून देण्यात आल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Vegetable Market Needs Police Protection, Latur