
लातूर : दिवाळीचे स्वागत सुरेल स्वरांनी व्हावे म्हणून पुण्या-मुंबईप्रमाणेच लातुरातही ‘दिवाळी पहाट’च्या संगीतमय मैफली होत आहे. याआधी एखादीच ‘दिवाळी पहाट’ लातुरात होत असे. पण रसिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन आता इतरही संस्था ‘दिवाळी पहाट’ सारखा उपक्रम आयोजित करीत आहेत. त्यामुळे लातुरात यंदा वेगवेगळ्या ‘दिवाळी पहाट’ रंगणार आहेत. यानिमित्ताने प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, युवा गायिका सूर्यागायत्री यांच्या स्वरांची मेजवानी, चेन्नई येथील ‘जिओश्रेड’वादक कलावंत महेश राघवन यांची साथसंगत लातूरकरांना ऐकण्यास मिळणार आहे.