Latur: वाहन दुरूस्त केली अन् डिझेलच नाही ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

latur zp News
वाहन दुरूस्त केली अन् डिझेलच नाही !

लातूर : वाहन दुरूस्त केली अन् डिझेलच नाही !

लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची चाहूल लागली असून, आचारसंहिता तोंडावर आली आहे. या स्थितीत मागील सहा महिन्यांपासून पंचायत समितीच्या सभापतींना देण्यात आलेल्या वाहनांना डिझेलसाठी निधीच उपलब्ध नाही. रेणापूर पंचायत समितीच्या सभापती बायनाबाई साळवे यांनी ही बाब बुधवारी (ता. १०) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निदर्शनास आणून दिली. त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी वाहनाची दुरुस्ती करून दिल्याचे सांगून डिझेलसाठी निधी नसल्याचे सांगितले.

सभागृहातील सर्वच सदस्यांनी हा विषय गांभीर्याने घेत सभापतींच्या वाहनांना डिझेल व दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून निधी देण्याची मागणी केल्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर यांनी निधी देण्यासाठी होकार दिला. जिल्ह्यात दहा पंचायत समित्या असून, बहुतांश सभापतींच्या वाहनांची ही स्थिती आहे. श्रीमती साळवे यांनी पोटतिडकीने हा विषय मांडला. दोन महिन्यांपूर्वी सभापती म्हणून निवड झाली आहे. आता आचारसंहिता लागेल आणि मला वाहन उपलब्ध करून दिले जात नाही. दुरुस्ती केली तरी डिझेल व ऑईलची गळती सुरू आहे.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

तेच बघत बसण्याची वेळ आली आल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या सभापतींनीही पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेला देण्यात येणाऱ्या निधीपैकी पन्नास टक्के निधी देण्याची मागणी केली. या विषयावरील चर्चेत सदस्य रामचंद्र तिरूके, संजय दोरवे, बस्वराज बिरादार व सुभाष पवार यांनी भाग घेत सभापतींची कुचंबणा व अवमान थांबवण्याची मागणी केली. तसेच अन्य विभागाकडील अखर्चित निधीतून हा खर्च भागवण्याचीही सूचना केली. त्यावर जवळगेकर यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे ६५ लाख रुपयांचा निधी असून, त्यातील निधी देण्याची तयारी दाखवली.

त्याला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांनी आक्षेप घेत हा निधी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या वाहन व मानधनासाठी असल्याचे स्पष्ट केले. चर्चा सुरू असतानाच सदस्य पवार संतप्त झाले, त्यांनी सभापतींच्या वाहनांना डिझेल मिळेपर्यंत पदाधिकारी व अधिकाऱ्यांचीही वाहने जिल्हा परिषदेतच लावण्यास सांगितले. जवळगेकर यांनी अखर्चित रक्कमेचा शोध घेऊन व संबंधित विभागाची संमती घेऊन सभापतींना मागील काळात केलेल्या खर्चासाठी तसेच यापुढील काळात निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ : इंग्लंडच्या पदरी झिरो; न्यूझीलंड ठरला हिरो

घरकुल व खाडाखोडमध्ये कारवाई

सुगाव (ता. चाकूर) ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने एकाच घरात पती व पत्नीला घरकुलाचा लाभ दिल्याचा व नळेगाव (ता. चाकूर) ग्रामसेवकाने इतिवृत्तात खाडाखोड विषय सदस्या धनश्री अर्जूने यांनी सभागृहात मांडला. तीन सभेत त्यांनी हा विषय लाऊन धरला तरी त्यावर काहीच कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अनेक सदस्यांनी त्यांची बाजू घेतली. बराच वेळ या विषयावर चर्चा झाली. दोन्ही प्रकरणात चौकशी अहवाल आला असून, संबंधितांवर कारवाई प्रस्तावित केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी लाऊन धरली तर अधिकारी विभागीय चौकशीतून जास्त शिक्षा होत असल्याचे सदस्यांना सांगत होते. शेवटी विभागीय चौकशी चांगल्या पद्धतीने करण्याची सूचना सदस्य दोरवे यांनी केली व विषयावरील चर्चा संपली.

loading image
go to top