सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये

जगदीश जोगदंड
Sunday, 4 October 2020

सरकारने हतबल शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

पूर्णा : सरकारने हतबल शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

प्रवीण दरेकर यांनी तालुक्यातील नावकी शिवारात रविवारी (ता.चार) अतिवृष्टीने खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या. बहुतांश पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सोयाबीन, कापूस, भाजीपाला, फळबागा यांना मोठ्या प्रमाणात तडाखा बसल्याने सर्वसामान्य शेतकरी हतबल झाला. अशा या स्थितीत राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा व संकटात सापडलेल्या शे‍तकऱ्यांना नुकसान भरपाई देवून संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. 

हेही वाचा - जिंतूरमध्ये पाण्याच्या प्रतिक्षेत नागरिक आतूर; पन्नास वर्षात तीन योजना, तरीही प्रश्‍न कायम

अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल

सरसकट पंचनामे केल्याशिवाय पर्याय नाही, राज्य सरकारद्वारे सरसकट पंचनामे करण्याचा निर्णय घ्यायला हवा, ओला दुष्काळ जाहीर करून बागायतदारांना प्रती हेक्टरी पन्नास हजार व कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी पंचवीस हजारांची तत्काळ मदत द्या, अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी भाजप भक्कमपणे उभा राहिल आठवडाभरात सरकारने निर्णय घेतले नाहीत तर भाजप रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, भाऊसाहेब देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विठ्ठलराव रबदडे यांच्यासह पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर पूर्णा येथे भाजपच्या तालुका व शहर कार्यालयाचे उद्‍घाटन प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा - हिंगोली जिल्हा कचेरीत रिक्त पदांचे ग्रहण सुटता सुटेना 

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे पाहणी 

कुरूंदा येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आले होते. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान व जलेश्वर नदीचा प्रश्न शासनाकडे मांडून तो प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यांच्यासोबत भाजपचे संघटन मंत्री भाऊराव देशमुख, जिल्हाध्यक्ष ॲड.शिवाजी जाधव, चंद्रकांत दळवी, खोब्राजी नरवाडे, अशोकराव दळवी, शिवाजीराव इंगोले, गणपत काळे, बबन सिद्धेवार, डिगांबर दळवी, विश्वनाथ धोसे आदींची उपस्थिती होती. या वेळी शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar demanded that the government should not see an end to the tolerance of farmers