
कांडली शिवारात काम करत असलेल्या शेतकऱ्याला बिबट्या दिसला. यावेळी शेतकऱ्याची बोबडी वळली. मात्र हिम्मत धरत त्याने आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने धुम ठोकल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवासंपासून अनेक भागात बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले. यापूर्वीही बिबट्याने आखाड्यावरील पाळीव प्राण्यांचे लचके तोडून ठार केले होते. पुन्हा एकदा कळमनुरी तालुक्यातील कांडली शिवारात गुरुवारी ( ता. सात) बिबट्याचे दर्शन झाले असून शेतात असलेल्या श्वानावर हल्ला केला आहे. या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून शेताकडे जाण्याचे टाळत आहेत.
कांडली शिवारात काम करत असलेल्या शेतकऱ्याला बिबट्या दिसला. यावेळी शेतकऱ्याची बोबडी वळली. मात्र हिम्मत धरत त्याने आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने धुम ठोकल्याचे शेतकऱ्याने सांगितले. कांडली शिवारात मागच्या काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता. त्यानंतर वनविभागाचे पथक येथे दाखल झाल्यावर त्यांनी पायाच्या ठशावरुन तो तरस असावा असा अंदाज वर्तवला होता. तीन ते चार दिवसानंतर कांडली शिवारापासुन जवळच असलेल्या शेवाळा गावाजवळ देखील बिबट्या दिसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. नंतर वनविभागाच्या पथकाने गावात भेट देऊन पाहणी केली तसेच गावकऱ्यांना दक्ष राहण्याचा सुचना दिल्या होत्या.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची घटनास्थळी पाहणी
गुरुवारी परत एकदा कांडली येथील शेतकरी संजय पानपट्टे हे शेतातील आखाड्यावर गेले होते. त्या ठिकाणी असलेली गाय व वासरु बाहेर सोडून ते काही अंतरावर गेले असतांना बिबट्याने वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे असलेल्या श्वानाने जोरात भुंकण्यास सुरवात केली. त्यानंतर बिबट्याने कुत्र्याच्या मानेलाच पकडले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पानपट्टे यांनी आरडा ओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढल्याचे श्री. पानपट्टे यांनी सांगितले. ही माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला कळविली. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे