सुरू करूया योगिक आहार

File photo
File photo

नांदेड :  हिवाळा सुरू झाला. त्यामुळे सर्वांनीच व्यायाम, योगा, योग्य आहाराकडे लक्ष द्यायला सुरवात केलीच असेल. फीट राहण्यासाठी जसे व्यायाम, प्राणायाम, योगा आवश्‍यक आहे, तसेच उत्तम आहारही योगशास्त्राने बंधनकारक केलेला आहे. याच आहाराला ‘योगिक आहार’ असे संबोधले जाते. 

जन्मानंतर प्राणवायू प्रमाणेच, जी गोष्ट आपल्या जगण्याचा ऊर्जास्त्रोत बनते ती म्हणजे अन्न. अन्न जर आपल्या जगण्याचे चैतन्य आणि आत्मबल बनत असेल तर ते चांगले आणि पौष्टिक असले पाहिजे. योगिक आहार म्हणजे पूर्णतः मांसाहारविरहित अन्न होय. सात्विक आहारात शेतकऱ्याने आत्मीयतेने उत्पादन केलेले पीक, (ज्याला सेंद्रिय प्रकारे घेतलेले अन्नधान्य असे म्हणणे संयुक्तिक ठरेल) तसेच नैसर्गिकरित्या पिकविलेल्या फळांचा समावेश असणे आवश्‍यक आहे. हल्ली कीटकनाशके आणि रसायनांचा भरपूर वापर पीकपद्धतीत होतो. या स्थितीत सात्विक अन्न आणि पिकांची कल्पना ही कल्पनाच ठरत आहे. मात्र अन्नप्रक्रिया किंवा शिजवताना फळे आणि पिकांमधील रासायनिक घटकांची मात्रा अगदी नगण्य करणे गरजेचे आहे. यासाठी भाजी निवडणे, साफ करण्यापूर्वी तिचे गरम पाण्यात निर्जंतुकीकरण करून घेणे गरजेचे झाले आहे.

सात्विक आहाराचे फायदे

शरीराला आवश्‍यक असणाऱ्या सर्वप्रकारच्या अन्नद्रव्यांचा यथायोग्य समावेश असलेला आहार घेतल्याने शरीराबरोबरच मन, शक्ती, बुद्धीचा विकास होतो. जीवनातील संयम, शांत आणि आंतरिक सामंजस्य, ताळमेळ घालणे; तसेच विचारकौशल्ये विकसित होण्यासाठी सात्विक आहाराचा फायदा होतो. शरीरस्वास्थ्यासाठी हा आहार उपयुक्त असून ऊर्जाही अधिक प्रमाणात मिळते. कच्च्या पालेभाज्या, मोड आलेली कच्ची कडधान्ये यांचाही समावेश या आहारात असल्याने दात, हिरड्यांना फायदा होतो.
 
योगिक आहारात काय खावे

  • निसर्गतः स्वाद देणारी सर्व फळे
  • सर्व पालेभाज्या, त्यात कांदा आणि लसूण यांचा वापर वर्ज्य असावा
  • तृणधान्ये, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी
  • कठीण कवच असलेल्या फळांच्या बिया, जसे की बदाम, काजू; जी अधिक भाजलेली किंवा खारट नसावीत.
  • प्रक्रियाविरहित साखर, नैसर्गिक फळांचे जाम, काकवी, मुरांबा
  •  हर्बल चहा, लिंबूपाणी.

योगिक आहारात हे टाळावे

  • अंडी, मांसजन्य पदार्थ
  • कृत्रिम अन्नसंरक्षके टाकलेले अन्नपदार्थ, फास्ट फूड, सोडा घातलेले अन्न
  • तळलेले पदार्थ
  • संरक्षक वेष्टनात मिळणारे अन्नपदार्थ
  • मैद्याचा समावेश असलेला आहार तसेच सल्फरयुक्त साखर
  • कांदा, लसणाचा समावेश असलेले मसाले
  • मायक्रोवेव्हमध्ये बनविलेले पदार्थ
  • अल्कोहोल, निकोटिनयुक्त अन्नपदार्थ
  • जनुकीय बदल करून पिकविलेले अन्नधान्य किंवा फळे, भाजीपाला.

सात्विक आहाराचे सहा घटक

  • ‘आयू’ : आयुष्य वाढविणारे
  • ‘सत्व’ : मनाची शुद्धता वाढविणारे
  • ‘आरोग्य’ :  स्वास्थ्य टिकविणारे
  • ‘बल’ : शक्ती वाढविणारे
  • ‘सुख’ : सौख्य देणारे
  • ‘प्रीत’ : सतत आनंद देणारे

आयुर्वेदात सांगितल्यानुसार ‘आयू’, ‘सत्त्व’, ‘आरोग्य’, ‘बल’, ‘सुख’ आणि ‘प्रित’ हे सहा घटक सात्विक आहारात असते. योगिक आहार घ्या, असे योगशास्त्र सांगते ते फक्त निरोगी, सशक्त तसेच दीर्घायू जगण्यासाठी. त्यामुळे आपल्या आहाराचे किमान चिंतन करा. पण दररोज थोडा थोडा बदल करा. तुमचे आयुष्य आणि दैनंदिन जगणे कसे आनंदी होते ते तुम्हीच पहा.
- डॉ. रंजना पाटील (आहारतज्ज्ञ)

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com