ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार–उदय सामंत 

विलास शिंदे
Sunday, 17 January 2021

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने अडचणी येत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत तक्रारी येत आहेत.

सेलू ( जिल्हा परभणी ) : शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, असे निर्देश  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी ( ता.१५ ) रोजी संबधित विभागाला दिले.

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय वांद्रे येथे ग्रंथालय विभागाची आढावा बैठक राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उदय सामंत म्हणाले, राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने अडचणी येत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत तक्रारी येत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम ग्रंथालयांच्या नावावर जमा होते. संस्थेचे पैसे संस्थेला मिळाले पाहिजेत व कर्मचाऱ्यांचे थेट त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे आवश्यक आहे. तसेच या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने झाले तर त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.तसेच या कर्मचाऱ्यांना शासनमान्य ग्रंथालयांचे ग्रंथालय ओळखपत्र देण्याच्या सूचनाही यावेळी श्री. सामंत यांनी दिल्या.

हेही वाचापरभणी : कुपटा येथिल कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच

तसेच निवडक शासनमान्य ग्रंथालयांमध्ये नवीन ग्रंथ विकण्याची परवानगी देण्याचाही प्रस्ताव तयार करावा. वाचन संस्कृतीला चालना मिळण्यासाठी व ग्रंथालय चळवळीला चालना देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरते ग्रंथालय हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा असेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले यासाठी नियमावली तयार केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता, ग्रंथालय संचालिका शालिनी इंगोले व संबंधित अधिकार्‍यांची उपस्थित होती.

सार्वजनिक ग्रंथालयात गेल्या अनेक वर्षापासून अगदी तुटपूंज्या पगारावर (मानधन) ग्रंथालय कर्मचारी आपले कर्तव्य बजावित आहेत.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कर्मचार्‍यांचे वेतन त्यांच्या बॅक खात्यात जमा करावे असा निर्णय घेवून ग्रंथालय कर्मचार्‍यांना नविन वर्षात नवे जिवदानच दिले.अशी प्रतिक्रिया येथिल स्वामी रामानंद तिर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाचे ग्रंथपाल महादेव आगजाळ यांनी 'सकाळ'शी बोलतांना दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Library staff salaries will be credited directly to their bank accounts online Uday Samant parbhani news