मित्र-मैत्रिणीला एकट्यात गाठून सामूहिक बलात्कार, चौघांना जन्मठेप

file photo
file photo

औरंगाबाद : मित्रासोबत बोलत थांबलेल्या 22 वर्षीय तरुणीला मारहाण करून सामूहिक अत्याचार करणाऱ्या चौघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठविला.

शेख तय्यब शेख बाबूलाल (21, रा. सुंदरवाडी) तालेम अली शौकत अली, शेख जमील शेख हुसेन बागवान आणि शेख अश्‍पाक शेख हुसेन (22, रा. तिघेही हिमायतनगर, चिकलठाणा) अशी आरोपींची नावे आहेत.
 
एसटीच्या विभागीय कार्यालयातील तरुणी 27 ऑगस्ट 2015 ला मित्राला भेटण्यासाठी जालना रस्त्यावरील केंब्रीज शाळेजवळ रात्री आठच्या सुमारास गेली होती. रस्त्याच्या बाजूला मित्रासोबत बोलत असताना दुचाकीवरून चौघेजण आले. त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली.

दोघांनी तरुणीला रस्त्यालगतच्या शेतात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. पीडितेचा मित्र जालना रस्त्यावर धावत आला असता त्याला गस्तीवर असलेली पोलिस व्हॅन दिसली. त्याने पोलिसांना हकीकत सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस येत असल्याचे पाहून अत्याचार करणाऱ्या चौघांनी पोबारा केला. एमआयडीसी सिडको पोलिसांनी पीडिताला घाटी रुग्णालयात हलविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घटना चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे संबधित अधिकाऱ्यांना घटनेची माहिती कळवली.

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या विशेष पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी वरील आरोपींना अटक केली. पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

विशेष न्यायालयासमोर सुनावणी 

सदर खटल्याची अंतिम सुनावणी विशेष न्यायालयासमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी 14 साक्षीदार तपासले. पीडिता, वैद्यकीय अहवाल, डीएनए रिपोर्ट, पीडिताचा मित्र यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने त्या चौघांना दोषी ठरवून जन्मठेप, प्रत्येकी 50 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

नुकसानभरपाईपोटी एक लाख रुपये पीडिताला देण्यात यावे असे आदेशात म्हटले. सोबतच प्रत्येक आरोपीला कलम 323 अतंर्गत सहा महिने, 504 अतंर्गत एक वर्ष व 506 अतंर्गत एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com