मजूर, गुत्तेदार, जिल्हा परिषद सदस्य अन् आता खासदार!

संतोष आचवले
शुक्रवार, 24 मे 2019

वडवळ नागनाथ (लातूर) : कुटूंबात अत्यंत हलाकीची परीस्थिती होती. वडीलांनी रोज मजुरीसाठी दारोदार भटकावे तेव्हा कुठे खायला भाकरी मिळत होती. अशा स्थितीत कौटुंबिक मतभेद वाढल्याने गाव सोडून गेलेला एक मजूर अथक परिश्रमाने व कर्तृत्वाने आज लातूरचा खासदार झाला. लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार सुधाकर शृंगारे यांची जन्मभूमी असलेल्या घरणी (ता. चाकूर) येथील ग्रामस्थांना त्यांच्या भूमिपुत्राचा मोठा अभिमान वाटत आहे.

वडवळ नागनाथ (लातूर) : कुटूंबात अत्यंत हलाकीची परीस्थिती होती. वडीलांनी रोज मजुरीसाठी दारोदार भटकावे तेव्हा कुठे खायला भाकरी मिळत होती. अशा स्थितीत कौटुंबिक मतभेद वाढल्याने गाव सोडून गेलेला एक मजूर अथक परिश्रमाने व कर्तृत्वाने आज लातूरचा खासदार झाला. लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार सुधाकर शृंगारे यांची जन्मभूमी असलेल्या घरणी (ता. चाकूर) येथील ग्रामस्थांना त्यांच्या भूमिपुत्राचा मोठा अभिमान वाटत आहे.

वडवळ नागनाथ जिल्हा परिषद गटातील घरणी या पाच लोकसंख्येच्या गावात अत्यंत सामान्य कुटूंबात सुधाकर शृंगारे यांचा जन्म पाच मे १९६२ रोजी झाला. गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडले. उदगीर येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीतच त्यांनी अर्धवट शिक्षण सोडून दिले. तेथून त्यांनी बंगळुरू व पुणे येथे काही दिवस बांधकाम क्षेत्रात मजूरीचे काम केले. बांधकाम व गुत्तेदारीचे धडे गिरवल्यानंतर त्यांनी मुंबईला जाऊन स्वत:ची गुत्तेदारी सुरू केली. अहोरात्र कष्ट करत त्यांनी काही वर्षात एक नामांकित बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) म्हणून ओळख निर्माण केली. धनदौलत मिळाली तरी त्यांनी पाय जमिनीवरच ठेऊन काम केले. गरजू तसेच समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात. बिल्डरसोबत एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांची ओळख आहे. आतापर्यंत त्यांनी अनेकांना लग्न व वैद्यकीय खर्चासाठी मदत केली आहे. सामाजिक कामातही त्यांचा सातत्याने हात ढिला असतो. 

शृंगारे यांनी आपले कौशल्य पणाला लावून गुत्तेदारीतून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. राजकारणाचा कसलाही गंध नसलेल्या श्री.शृंगारे यांना माजी राज्यमंत्री तथा अहमदपूर-चाकूरचे आमदार विनायकराव पाटील यांनी दोन वर्षापूर्वी राजकारणात आणले. भाजपच्या उमेदवारी देऊन त्यांना वडवळ नागनाथ गटातून निवडून आणून जिल्हा परिषद सदस्य केले. तेथूनच शृंगारे हे लोकसभेचे उमेदवार असल्याची चर्चा होऊ लागली. त्यानंतर अनेक अडथळ्याची शर्यत पूर्ण करून त्यांनी लोकसभेची उमेदवारी मिळवली व मागील लोकसभेचा मताधिक्क्याचा विक्रम मोडित काढून विजय मिळवला. आपल्या गावच्या भूमिपूत्राने मिळवलेला हा विजय घरणीकरांची छाती फुगवणारा ठरला आहे.

वडवळ येथे जल्लोष
शृंगारे मोठ्या मताधिक्याने विजयी होताच वडवळ नागनाथसह जिल्हा परिषद गटातील घरणी, लातूररोड, मोहनाळ, आष्टा येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष अशोकराव चिंते, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष माणिकराव हलिंगे, महारूद्र मुळे, दिलीप शिंदे, बालाजी चांगुले, बालाजी अरगुंडे, दत्ता सूर्यवंशी, गोपाळ तोरे, ज्ञानोबा मुंगे, बसवेश्वर स्वामी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: life of Latur MP Sudhakar Shrungare